मुंबई | उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी ‘एनआयए’ला दिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. यावेळी त्यांनी माझे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत, असं भावनिक स्पष्टीकरण दिलं.
अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते असा टोला लगावताना तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा असा उपहासात्मक सल्ला अतुल भातखळकर यांनी दिला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आरारा… काय वेळ आली आहे अनिल परब यांच्यावर…त्यांना कोणी तरी सांगा, ह्याच्या त्याच्या शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते. तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा”.
आरारा… काय वेळ आली आहे अनिल परब यांच्यावर…
त्यांना कोणी तरी सांगा, ह्याच्या त्याच्या शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते. तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 7, 2021
सचिन वाझेंच्या पत्रात काय लिहिले आहे?
सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करणारे पत्र न्यायालयात सादर केले. ‘‘आपल्याला पोलीस दलात सहभागी करून घेतल्यानंतर काही ठिकाणी निदर्शने झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा निलंबित करण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दूरध्वनी संभाषणाद्वारे दिली होती. मी पवार यांचे मतपरिवर्तन करतो, मात्र त्या बदल्यात दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी देशमुख यांनी केली. असमर्थता दर्शवताच देशमुख यांनी नंतर सावकाश द्या’’, असे सांगितल्याचा दावा वाझे यांनी पत्रात केला.
या वर्षी जानेवारी महिन्यात देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी बोलावून शहरातील १६५० बारकडून प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. मंत्री परब यांनी ‘एसबीयुटी’च्या(सैफी बु-हाणी अप लिफ्टमेंट ट्रस्ट) विश्वास्तांविरोधात प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. ही चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव विश्वास्तांसमोर ठेवण्यास सांगितले. तसेच महापालिकेच्या कंत्राटदारांविरोधात निनावी तक्रारीवर ‘सीआययू’कडून चौकशी सुरू होती. परब यांनी यातील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप वाझे यांनी या पत्रात केला आहे.
अनिल परब यांचं स्पष्टीकरण काय आहे?
‘‘मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे खंडणीचे उद्योग करत नाही. माझे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत,” असं स्पष्टीकरण परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलं. “मला आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून, सत्य समोर यावे यासाठी नार्को चाचणीलाही तयार आहे,” असं परब यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
“तिसरी विकेट काढणार, असे गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेते म्हणत होते. याचा अर्थ दोन दिवसानंतर सचिन वाझे पत्र देणार हे त्यांना आधीच माहिती होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करा, असे हे भाजपचे कारस्थान आहे. त्यातूनच ‘एनआयए’मार्फ त वाझे यांच्याकडून पत्र लिहून घेण्याचे कथानक भाजपने रचले. माझ्यासह महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा हा डाव आहे. त्यामुळे सत्य समोर यावे, यासाठी कुठल्याही चौकशीला माझी तयारी आहे. त्यासाठी माझी नार्को चाचणी करण्याचीही तयारी आहे, असे अनिल परब यांनी सांगितले. सैफी ट्रस्टकडून मी पैसे घेण्यास सांगितले आणि जानेवारी २०२१ ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना त्यांना दिल्या, असे दोन आरोप सचिन वाझे यांनी केले आहेत.
या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी ते आरोप फेटाळत आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत. जूनमध्ये व जानेवारीमध्ये मी हे सांगितल्याचा आरोप सचिन वाझे करतात. मग इतक्या दिवसांत तक्रार का केली नाही. परमबीर सिंहांच्या पत्रात या गोष्टींचा उल्लेखही नाही, याकडेही परब यांनी लक्ष वेधले. त्यामुळे एनआयए, सीबीआय, नार्को अशा कोणत्याही चौकशीला सामोरा जायची माझी तयारी आहे,” असं अनिल परब म्हणाले आहेत. दरम्यान, आज (८ एप्रिल) सुप्रीम कोर्टात अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.