HW News Marathi
महाराष्ट्र

रोगजंतुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साबणाने वेळोवेळी हात धुण्याची सवय आवश्यक

मुंबई | मानवी हात हा वेगवेगळ्या रोगजंतुंचा वाहक ठरतो. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या वेळोवेळी हात धुण्याचे महत्व अधोरेखीत झाले आहे. पण फक्त कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही लोकांनी वेळोवेळी साबणाने हात धुणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. यातून आपण नानाविध आजार टाळू शकतो. पण सध्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी लोकांनी साबणाने वेळोवेळी हात धुण्याची सवय अंगिकारणे गरजेचे झाले आहे.

साबणाने हात केव्हा धुवावेत ? जेवणापूर्वी, शौचाहून आल्यानंतर, स्वयंपाकापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, बाळाचा शौच स्वच्छ केल्यानंतर, प्रवास संपवून घरात, कार्यालयात आल्यानंतर इत्यादी वेळी हात धुण्याच्या सवयीने आपण अतिसार, हगवण, पटकी, विषमज्वर, पोलिओ, काविळ, स्वाईन फ्लू, कोरोना विषाणू इत्यादी रोग टाळू शकतो. आजार टाळण्यासाठी स्वच्छतेविषयक काळजी सर्व काळात घेणे आवश्यक असते. किंबहुना स्वच्छता ही आपली जीवनशैली बनणे गरजेचे आहे. पण बरेचजण याविषयी फक्त साथीच्या काळातच काळजी घेताना दिसतात. फक्त साथीच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही स्वच्छतेविषयक काळजी घेणे तसेच वेळोवेळी साबणाने हात धुणे अत्यंत गरजेचे आहे.

हात का व केव्हा धुवावेत ?

आपले हात नेहमीच घामेजलेले असतात. नानाविध वस्तुंशी हातांचा संपर्क येत असतो. त्यावेळी त्या वस्तुवरील घाण, रोगजंतू हातातील घामात मिसळतात. हातावर घाणीचा बारीक थर व रोगजंतू जमतात. जेवणापूर्वी हात न धुतल्यास ही घाण व रोगजंतू थेट पोटात जाऊन विविध रोगास कारणीभूत ठरतात. त्यामुळे जेवणापूर्वी साबणाने हात धुणे महत्वाचे ठरते.

  • बाळास भरविण्यापूर्वी साबणाने हात धुणे अत्यावश्यक.
  • स्वयंपाकापूर्वी साबणाने हात धुणे अत्यावश्यक.
  • मुंबईतील बहुतांश लोक दररोज रेल्वे अथवा बसने प्रवास करतात. रेल्वे, बसमध्ये हात पकडण्यासाठी लावण्यात आलेले हँगर अनेक व्यक्तिंच्या हाताच्या स्पर्शाने, त्यातील घाम व घाणीने दुषीत झालेले असतात. आपल्या हातांचा या हँगरशी संपर्क येतो व आपले हातही दुषीत होतात. त्यामुळे प्रवास संपल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • नेहमी प्रवास करणाऱ्यांनी आपल्या सोबत पेपरसोप ठेवावा व हात धुण्यासाठी त्याचा वेळोवेळी वापर करावा.

हात धुण्याची पद्धत :

फक्त पाण्याने हात धुऊ नयेत. यासाठी पाण्याबरोबर साबणाचा वापर करावा. सुरुवातीस पाण्याने हात ओला करावा. त्यानंतर साबणाने तळहातावर फेस करावा. हा फेस बोटे, बोटांच्या खाची, तळहात व मनगटापर्यंत सुमारे २० ते ३० सेकंद चोळावा. नंतर हा फेस पाण्याने स्वच्छ धुवावा. तद्नंतर हात वाळवावेत किंवा स्वच्छ कापडाने पुसावेत.

हात कशाने धुवावेत ?

हात साबणाने किंवा (साबण उपलब्ध नसल्यास राखेने) धुवावेत. हात धुण्यासाठी लिक्विड सोप किंवा प्रवासादरम्यान पेपर सोपही वापरता येईल.

हे टाळा :

हात मातीने अजिबात धुवू नयेत. मातीमध्ये रोगजंतू असण्याची शक्यता असते. त्यामुळे यातून रोगप्रसार होण्याची शक्यता असते.

हे पाळा :

  • हात धुण्याबरोबर हाताची नखे नियमित कापणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण बरेच रोगजंतू व घाण नखात अडकते. जेवताना हे रोगजंतू किंवा घाण पोटात जाते व विविध रोगास कारणीभूत ठरते.
  • शौचविधीहून आल्यानंतर हात धुतल्याने साबणसुद्धा दुषीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे शौचाहून आल्यानंतर हात धुण्यासाठी वेगळा साबण वापरावा. लिक्विड सोप वापरल्यास अधिक चांगले.

हस्तांदोलन करताना सावधान !

ओळखीच्या व्यक्ती भेटल्यानंतर परस्परांना हस्तांदोलन करण्याची पद्धती सर्वत्र आढळते. खरे तर ही पाश्चिमात्य पद्धती आहे. एका सर्व्हेक्षणानुसार हस्तांदोलन करताना विविध रोगजंतुंचा एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे प्रसार होऊ शकतो. बऱ्याच व्यक्तींना हात धुण्याची सवय नसते. अशा व्यक्तींचे हात रोगजंतुयुक्त असू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींशी हस्तांदोलन केल्यास आपले हातसुद्धा घाण व रोगजंतुंनी प्रभावीत होऊ शकतात. त्यामुळे हस्तांदोलन करताना सावधानता बाळगलेली बरी. जेवण करण्यापूर्वी आणि मलविसर्जनानंतर स्वच्छ हात धुतल्यामुळे अतिसाराशी संबंधीत रोग 50 टक्क्यांनी कमी झाल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे.

जागतिक हात धुवा दिन

वेळोवेळी हात धुण्याबाबत अनेक लोकांमध्ये कमालीची अनास्था असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यासाठी युनिसेफमार्फत दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक हात धुवा दिन’ साजरा करण्यात येतो. राज्यात यानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये दुपारच्या भोजनापूर्वी प्रत्येकाने साबणाने हात धुण्याची मोहीम राबविण्यात येते. तसेच संबंधित जिल्ह्यातील स्वच्छता अभियान कक्षांच्यावतीने साबणाने हात धुण्याच्या सवयीच्या प्रचारार्थ विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येतात. याअंतर्गत मेळावे, कार्यशाळा, जनजागृती सभा, जनजागृती स्टॉल, शाहिरांचे कार्यक्रम, माहितीपत्रकांचे वितरण अशा माध्यमातून साबणाने वेळोवेळी हात धुण्याचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यात येतो. स्वच्छतेची शपथ घेऊन आदर्श जीवनाचा संकल्प केला जातो. आपणही आतापासून हा संकल्प पाळूया!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस…”, बहिणीच्या पंकजांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा      

News Desk

तुकाराम मुंढे नागपूर महापालिका आयुक्त तर अश्विनी भिडेंची मेट्रो – ३ प्रकल्पातून उचलबांगडी

swarit

सरकारनं सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही – विखे पाटील

News Desk