HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसैनिक हा माझा प्राण आहे, माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे – बाळासाहेब ठाकरे

मुंबई | हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. देशात प्रादेशिक पक्षांच्या सुरु असणाऱ्या राजकारणाची सुरुवातच मुळात शिवसेनाप्रमुखांकडून झाली होती याचं स्मरण करुन देत बाबरी प्रकरण पेटत गेलं तेव्हा अनेकांनीच यातून आपलं अंग काढून घेतलं. पण, त्याचवेळी खुद्द बाळासाहेब ठाकरे गर्जना करत पुढे आले आणि बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असल्याच त्याचा मला अभिमान आहे, अशी गर्जनाच केल्याचं म्हणत तो काळ अग्रलेखातून पुन्हा उभा करण्यात आला.

‘फ्री प्रेस जर्नल’मधून बाळासाहेब बाहेर पडले आणि राजकीय व्यंगचित्रांवर आधारित ‘शंकर्स विकली’ या दिल्लीहून निघणाऱ्या नियतकालिकाच्या धर्तीवर मुंबईत प्रयोग करायचा असं बाळासाहेबांनी ठरवलं. प्रबोधनकारांकडे त्यांनी हा विषय मांडताच होकार तर मिळालाच शिवाय प्रबोधनकारांनी साप्ताहिकाला नावही दिलं..‘मार्मिक’. १३ ऑगस्ट १९६० रोजी ‘मार्मिक’ सुरू झालं आणि पाहता पाहता त्यांनी मराठी मनाचा कब्जा घेतला. बाळासाहेबांचे दौरे, भाषणं सुरू झाली. ते पाहून एके दिवशी प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना संघटना काढण्यास सांगितलं आणि नावही देऊन टाकलं ‘शिवसेना’. मार्मिक’च्या ५ जून १९६६ च्या अंकात शिवसेनेच्या स्थापनेबाबतची चौकट छापून आली. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला मेळावा होणार असल्याचं ‘मार्मिक’मध्ये जाहीर झालं.

‘शिवाजी पार्क’वर सभा घ्यायची असं बाळासाहेबांनी ठरवलं. पण काही बुजुर्ग मंडळींनी पुरेशी उपस्थिती नसली तर पहिल्याच सभेचा बार फुसका ठरेल अशी शंका व्यक्त करत बंदिस्त सभागृहात पहिली बैठक घ्यायची सूचना केली. पण बाळासाहेब ठाम राहिले. सभेच्या दिवशी दुपारपासूनच ढोल-ताशे, लेझिमच्या तालावर पावलं टाकत मराठी माणूस शिवाजी पार्कवर गर्दी करू लागला. सायंकाळपर्यंत मैदान गर्दीने फुलून गेले. प्रबोधनकारांनी ‘ठाकरे कुटुंबाचा बाळ या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे’ असे जाहीर केलं आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ‘शिवसेना’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे’ या दोन नव्या शक्तींचा उदय झाला. मुंबई महानगरपालिकेच्या १९६८ च्या निवडणुकीत शिवसेनेने मधु दंडवते यांच्या प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली आणि शिवसेनेने ४० जागा जिंकल्या. डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना शिवसेनेचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाला.

फेब्रुवारी १९६८ च्या ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर जळजळीत अग्रलेख लिहिला आणि त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये ते बेळगावला गेले. परत आल्यावर त्यांनी इशारा दिला, ‘निश्चित कालमर्यादेत केंद्राने सीमाप्रश्न सोडवला नाही तर केंद्रीय मंत्र्यांना, काँग्रेस पुढाऱ्यांना मुंबईत प्रवेश नाही’. त्यातून आधी यशवंतराव चव्हाणांची आणि नंतर १९६९ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. मोरारजींनी आंदोलकांवरून गाडी पुढे दामटण्यास चालकाला सांगितलं. त्यातून आंदोलन सुरू झालं व मुंबई पेटली. पोलिसांच्या गोळीबारात तब्बल ५२ माणसं मृत्युमुखी पडली. आंदोलन दडपण्यासाठी बाळासाहेबांना अटक झाली. ही त्यांच्या आयुष्यातील पहिली अटक. यातूनच शिवसेना स्टाईल ‘मुंबई बंद’ सुरू झाला. १९६७ च्या डिसेंबरमध्ये परळच्या दळवी बिल्डिंगवरील हल्ल्याच्या घटनेपासून शिवसेना-साम्यवादी संघर्ष चिघळला होता. १९७० च्या जूनमध्ये साम्यवादी आमदार कृष्णा देसाईंचा खून झाला.

कृष्णा देसाईंच्या निधनामुळे परळला पोटनिवडणूक झाली आणि सेनेचे वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले. सप्टेंबर १९७३ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या उद्योग संचालनालयाने स्थानिक भूमिपुत्रांना सर्व श्रेणींत नोकऱ्या दिल्या पाहिजेत असा आदेश काढला. हा सेनेचा विजय होता. मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती.

सुरुवातीच्या काळात राजकीय क्षेत्र आणि कामगार क्षेत्रात दबदबा वाढविण्यासाठी शिवसैनिकांनी जाणीवपूर्वक अंगिकारलेल्या राडा संस्कृतीमुळे शिवसेनेची मुंबई आणि कोकणात जबरदस्त पकड बसली. तोवर मुंबईच्या कामगार क्षेत्रावर कम्युनिस्ट आणि समाजवादी संघटनांची पकड होती. ही मोडून काढण्यासाठी सेनेने प्रसंगी दंड, भेद नीतींचाही वापर केला आणि एकहाती अंमल प्रस्थापित केला. अमोघ वकृत्वासोबत, भेदक व मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन ही बाळासाहेबांची खास शैली होती. बाळासाहेबांच्या लेखनालादेखील त्यांच्या प्रखर भाषणांइतकीच प्रभावी धार होती, म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी अनोखी ओळख मिळाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा राज्यातील प्रभाव वाढत असतानाच राजकारणातही ही संघटना पाय रोवत होती. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकल्यानंतर राजकारणातील शिवसेनेचा ठसा अधिकच ठळक झाला, आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याकरिता स्थापन झालेली ही संघटना राजकीय पक्षाच्या रूपात उदयास येऊ लागली.

राष्ट्रीय राजकारणातही शिवसेनेचे नाव अधोरेखित होऊ लागले. याच काळात शिवसेनेच्या अभेद्य तटबंदीला छगन भुजबळ, गणेश नाईक आदी नेत्यांनी पक्षांतराचे खिंडार पाडले. शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून राज्याच्या विधानसभेत सरकारविरुद्ध लढणारे भुजबळ पक्षाबाहेर पडल्यानंतर संघटना दुबळी होईल, ही अटकळ बाळासाहेबांनी फोल ठरविली आणि पक्षाला नवी ताकद देण्यासाठी अविश्रांत परिश्रम सुरू झाले. झंझावाती दौरे, सभा घेत आणि माणसे जोडत बाळासाहेबांनी शिवसेनेला नवी संजीवनी देण्याचा जणू ध्यास घेतला, आणि राजकीय समीकरणांचाही आढावा घेण्यास सुरुवात केली.

हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात हुकुमाचा एक्का ठरणार हे बाळासाहेबांच्या जाणकार आणि द्रष्टय़ा नजरेने ओळखले आणि याच मुद्दय़ाच्या आधारावर त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करून युतीच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. तोवर राष्ट्रीय राजकारणात युती आघाडीच्या राजकारणाचा जम बसलेला नव्हता. शिवसेना-भाजप युतीचा हा प्रयोग अभूतपूर्व यशस्वी ठरला आणि १९९५ ते २००० हा काळ शिवसेना-भाजपसाठी सुवर्णकाळ ठरला. देशात आणि महाराष्ट्रातही सेना-भाजपच्या राजनीतीला जनतेचा अभूतपूर्व कौल मिळाला. महाराष्ट्रात युतीचा भगवा फडकला, आणि बाळासाहेब ठाकरे हे निर्विवाद नेते ठरले. युतीच्या सत्ताकाळात बाळासाहेबांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे साकारून महाराष्ट्रात जिवंत झाली. दोन रुपयांत गरीबांना झुणकाभाकर देणे हे त्यांचे स्वप्न होते.

युतीचे सरकार राज्यात आल्यावर ते साकारले. पुढे व्यवस्थापनातील ढिलाईमुळे ही योजना टिकाव धरू शकली नाही, पण एका क्रांतिकारी निर्णयाचे शिल्पकार म्हणून बाळासाहेबांचे नाव महाराष्ट्राच्या सत्तापटलावर कायमचे कोरले गेले. राज्यात मातोश्री वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडीवासीयांना मोफत घरे, मुंबईतील उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अशी अनेक स्वप्ने जपत महाराष्ट्राच्या सामाजिक व भौतिक विकासाचा ध्यास बाळासाहेबांनी घेतला होता. यापैकी अनेक योजना साकारल्या आणि द्रुतगती मार्ग, उड्डाणपूल अशा योजनांनी महाराष्ट्राच्या विकासाची नवी दालने खुली झाली. शिवसैनिक हा माझा प्राण आहे, ही माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे असे सांगत सामान्य शिवसैनिकाच्या हृदयात घर करणाऱ्या या असामान्य नेत्याने आपल्या अखेरच्या भाषणातही, त्याचाच पुनरुच्चार केला होता. माझे हृदय तुमच्यापाशी आहे, असे सांगत बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची हृदये काबीज केली. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या हृदयातील स्थान यापुढेही अढळ राहणार आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार!  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

’19 दिवसात दिले तब्बल 10 कोटी डोस’, देशात लसीकरण वेगाने!

News Desk

मनसेसोबत युती? देवेंद्र फडणवीस म्हणाले….

News Desk