HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात 16 जानेवारीला नागपूर ‘राजभवनाला घेराव’ घालणार!- बाळासाहेब थोरात

मुंबई | केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. हे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर जवळपास मागील ४५ दिवसांपासून लाखो शेतकरी हाडं गोठवणाऱ्या थंडीत ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आतापर्यंत ६० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते १६ जानेवारीला नागपूर येथील ‘राजभवनला घेराव’ घालणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार निवडक उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असून या सरकारला देशातील गोरगरीब जनता शेतकरी, कामगार यांचे काही देणे घेणे नाही. केंद्र सरकारने संसदेच्या नियमांना पायदळी तुडवून आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे आहेत. भांडवलदारांच्या हिताचे हे कायदे तात्काळ रद्द करावेत ही शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकऱ्यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून निर्दयी केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूट सुरु आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी १६ जानेवारी रोजी नागपूर येथे आंदोलन केले जाणार आहे.

शेतकऱ्यांबरोबर मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचा उद्योग सुरु केला आहे. पेट्रोल डिझेलमध्ये सतत दरवाढ करु नफेखोरी केली जात आहे. इंधन दरवाढीने ७३ वर्षातील उच्चांक गाठला आहे. मे २०१४ मध्ये पेट्रोलवर असलेली ९.२० रुपये एक्साईज ड्युटी वाढवून मागील सहा वर्षात मोदी सरकारने ३२.९८ रुपये केली आहे, लिटरमागे २३.७८ रुपयांची वाढ म्हणजे तब्बल २५८ टक्के वाढ तर डिझेलची मे २०१४ मध्ये असलेली ३.४६ रुपये एक्साईज ड्युटी आज ३१.८३ रुपये केली म्हणजे प्रति लिटर २८.३७ रुपये आणि ८२० टक्क्यांची वाढ. विशेष म्हणजे जगात क्रूड ऑईलचे दर ११० डॉलर प्रति बॅरलवरून ५० डॉलर प्रति बॅरल एवढे घसरलेले असताना ही इंधन दरवाढ केली जात आहे. इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आतापर्यंत १९ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोक व शेतकरी यांच्यावरच होत आहे.

शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच उभा राहिला असून १६ जानेवारीला ‘किसान अधिकार दिवस’ पाळत आंदोलन केले जात आहे. भाजपाच्या मनमानी कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे. लोकशाही मूल्ये व संविधानाला पायदळी तुडवत लहरी कारभार सुरु आहे. काँग्रेस पक्ष या जुलमी सरकारविरोधात याआधीही रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. हे काळे कायदे केंद्र सरकार रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहू, असेही थोरात म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचे नेतृत्व,कर्तृत्व, त्याग, बलिदानाचे योगदान सर्वाधिक – अजित पवार

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

News Desk

पंतप्रधान जरी वेगळ्या विचाराचे असेल तरी त्यांना आपलंच  पुणे हवहवसं वाटतंय – सुप्रिया सुळे

News Desk