HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

स्वबळावर सर्व निवडणुका जिंकण्यासाठी संघटन मजबूत करणे हाच संकल्प !

मुंबई । भारतीय जनता पार्टीने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्याचा संकल्प प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (१० जून) आपल्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी सेवाकार्याचे आयोजन केले होते.

वाढदिवसाचा संकल्प काय असे विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, “भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी तीन पक्ष एकत्र असले तरीही आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपा स्वबळावर जिंकेल इतके मजबूत पक्ष संघटन निर्माण करणे हा आपला संकल्प आहे. भाजपा आज राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपाच्या विरोधात सत्ताधारी आघाडीचे तीन पक्ष एकत्र असूनही भाजपाने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली. त्याच पद्धतीने साडेसहा हजार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविला. पक्षाचे संघटन मजबूत आहे, ते आणखी मजबूत करणार आहोत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार समाजातील वंचितांसाठी शक्य तेवढे काम करण्याचा आपला सामाजिक संकल्प असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील वंचित घटकांतील १३२० जणांना खासगी रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठीची मोफत कुपन देण्यात आली. तसेच मतदारसंघातील ३ हजार रिक्षाचालकांना सीएनजी इंधनासाठी प्रत्येकी १ हजार रुपयांची कुपन देण्यात येत आहेत. त्यापैकी अडीच हजार रिक्षाचालकांना गुरुवारी वाटप करण्यात आले. मतदारसंघातील २० हजार मुलींना शिलाईसह ड्रेसचे कापड देण्यात येणार आहे. कोरोनाचा आर्थिक फटका बसलेल्या छोट्या व्यावसायिकांना १० हजार ते ५० हजार रुपये कर्जाच्या स्वरुपात मदतही करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Related posts

नाशिक महापालिकेने वाहिली गायीला श्रद्धाजंली

News Desk

संपापुढे सरकार झुकलं ,अल्पभूधारक शेतक-यांना कर्जमाफी

News Desk

गेले ६ महिने कोरोना कुठे झोपला होता का? । सदाभाऊ खोत

News Desk