HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“शिवसेनेची परंपरागत सत्ता काढून घेण्यासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊ”, प्रसाद लाड यांचे सुचक वक्तव्य

मुंबई | गेले अनेक दिवस भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तृळात रंगताना दिसत आहे. अर्थात भाजप नेत्यांकडून मनसेसोबत आता तरी युती होणार नाही असं म्हटलं गेलं होतं. अशात आता भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.  मात्र, आजची भेट ही वैयक्तिक होती हे प्रसाद लाड यांनी जोर देऊन सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, “राज साहेबांसोबत ही वैयक्तिक भेट होती. राज ठाकरेंच्या हाताला दुखापत झाली हे समजलं होतं पण कोरोनाच्या काळात भेट झाली नव्हती. त्यामुळे आज ही सदिच्छा भेट घेतली”. तसेच, मुंबई महानगरपालिका निवडणुक आली आहे त्यामुळे भाजप मनसे एकत्र लढणार का असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी वेळ आली की उत्तर देऊ असे म्हटले. तसेच, महानगरपालिकेवर यंदा भाजपचा झेंडा फडकणारच असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. पुढे ते असंही म्हणाले की, शिवसेनेची जी परंपरागत सत्ता आहे ती काढून घेणार. त्यासाठी जे योग्य असेल आणि जे बरोबर येतील त्यांना घेऊन जाणार असे सुचक विधान यावेळी प्रसाद लाड यांनी केले.

Related posts

देशाचे लॉकडाऊन २१ दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही, केंद्राचे स्पष्टीकरण

News Desk

चेंबूर येथील आगीला दुतर्फा लावलेल्या गाड्या जबाबदार

News Desk

उत्तर प्रदेशात स्कूल व्हॅनला ट्रेनच्या धडकेत १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

News Desk