मुंबई | “मी पक्ष सोडला म्हणूनच बाळासाहेब थोरातांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले. नाहीतर बाळासाहेब थोरात यांचे स्वतःचं कर्तृत्व काय ? गांधी-नेहरुंचे विचार सोडून ते ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवत आहेत”, अशी अत्यंत बोचरी टीका भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे-पाटलांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर केलेल्या या टीकेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
“मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरातांना पद मिळाले. बाळासाहेब थोरातांनी जर राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असता तर आम्हाला आनंदच झाला असता. मात्र, इथे फक्त सत्तेतील वाटा मिळवण्यासाठी लाचारी केली जात आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी बाळासाहेब थोरातांची मोठी धडपड सुरु आहे. थोरात महसूलच्या निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा बोलवत आहेत. ह्यात मोठा गौडबंगाल आहे”, असा गंभीर आरोप देखील विखे यावेळी बाळासाहेब थोरातांवर केला आहे.
बाळासाहेब थोरातांसह त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला आहे. “राज्यातील सरकार गोंधळलेलेच आहे. या सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही”, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. “सरकार टिकवण्यासाठी सत्तेचा सारीपाट खेळला जात आहे. सत्तेतील वाटा मिळवण्यासाठी लाचारी केली जात आहे. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी धडपड सुरु आहे. राज्यातील लोक, शेतकऱ्यांची कोणालाही परवा नाही”, असेही राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.