HW News Marathi
Covid-19

मान्सून काळात ‘एकात्मिक पूर इशारा यंत्रणा’ मुंबईसाठी वरदान ठरेल !

मुंबई | मान्सून काळात एकात्मिक पूर इशारा यंत्रणा (इं‍टिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम) ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पूर येणार आहे तसेच अगदी वादळासारख्या संकटाची देखील पूर्व सूचना मिळून सावध होता येणार आहे. या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या भागात गटारी, नदी यातील रिअल टाईम होणारी पाण्याची होणारी हालचाल, त्याचे प्रवाह याचे आडाखे बांधता येणे शक्य होईल. यामुळे मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचविणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१२ जून) केले.

भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत तयार केलेल्या एकात्मिक पूर इशारा यंत्रणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ.एम.महापात्रा, भारतीय हवामान विभाग मुंबईचे उपमहासंचालक डॉ.के.एस.घोसालीकर यांच्यासह देशातील विविध विभागीय हवामान वेधशाळेचे प्रमुख सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मी सर्वप्रथम भारतीय हवामान विभागाचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी मान्सून ११ तारखेला येणार असे जाहीर केले होते , त्याप्रमाणे बरोब्बर पावसाने हजेरी दिली. आणखी एका कारणासाठी अभिनंदन करायचे आहे ते म्हणजे निसर्ग चक्रीवादळाची सगळी इत्यंभूत माहिती हवामान खाते देत होते. या वादळाची दिशा बदलली तसेच त्याचा वेग मंदावला वगैरे गोष्टी आम्हाला कळत होत्या त्यामुळे तशी यंत्रणा सज्ज होती. यामुळे जीवितहानी टाळता आली.

कोणतीही आपत्ती आली तर आपण त्यापासून काय शिकतो हे महत्वाचे आहे. केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन सध्या देशातील सर्वात व्यस्त मंत्री असतील. आरोग्यमंत्री म्हणून ते कोरोनाचा मुकाबला करीत आहेत. त्यांच्या दृष्टीने आता ब्लड मॅनेजमेंट आणि फ्लड मॅनेजमेंट दोन्ही महत्वाचे आहे. मुंबईसह राज्याने २००५ मध्ये पुरामुळे नुकसान अनुभवले. यात हाय टाईड आल्यावर समुद्रातून उलटे पाणी येऊन मुंबईत पाणी साचते या बाबी लक्षात आल्या. हे टाळण्यासाठी आम्ही पंपिंग स्टेशन्सही बसवले. त्याचकाळात पावसाळ्यानंतर लेप्टो, डेंग्यू अशा साथी आल्या. या साथींचे निदान होण्यासाठी २००७ मध्ये मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये देशातली पहिली मॉलिक्युलर लॅब आम्ही बनविली. आता कोरोना साथीतही आम्ही शिकलो. त्यामुळेच पूर्वी २ लॅब होत्या त्या ८५ झाल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच आम्ही मंत्रिमंडळात पर्यावरण विभागाचे नाव बदलून ‘पर्यावरण आणि वातावरणीय बदल’ विभाग असे केले आहे. पर्यावरणाकडे एका वेगळ्या नजरेने आणि गांभीर्यपूर्वक पाहण्यास आमची सुरुवात झाली आहे, असे नमूद करतांनाच, येत्या काळात भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी डॉपलर रडार लवकरात लवकर बसविले पाहिजे जेणे करून हवामांचा अचूक अंदाज शक्य होईल, अशी मागणी ही ठाकरे यांनी यावेळी केली.

केंद्रीयमंत्री डॉ.हर्षवर्धन म्हणाले की, या यंत्रणेच्या निमित्ताने पुराचा इशारा देणारी देशातील अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत झाली आहे. ही यंत्रणा मुंबईसाठी खूप उपयोगी ठरणार असून ही कार्यान्वित केल्याबद्दल भारतीय हवामान खाते आणि मुंबई महापालिकेचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी घोसालीकर यांनी मुंबईत ४ डॉपलर रडार लावण्याची प्रक्रिया सुरु असून पुढच्या मान्सूनच्या आधीच रडार कार्यरत होतील, असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री हस्ते पूर इशारा यंत्रणेच्या ई- उद्घाटनासह यंत्रणेच्या डिजिटल ब्राऊचर्सचे प्रकाशन करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला रोज ८ लाख लसींची गरज पण मिळतायत २५ हजार, आरोग्यमंत्र्यांची खंत

News Desk

राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, ‘ही’ आहे नवी तारीख 

News Desk

भाजपकडून काहींना बडबड करण्याचा ठेका, मात्र आम्ही काडीचीही किंमत देत नाही !

News Desk