HW News Marathi
महाराष्ट्र

लालफीत, दफ्तरदिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करत राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा! – मुख्यमंत्री

मुंबई । लालफीत, दफ्तरदिरंगाई या शब्दांना हद्दपार करत सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करताना राज्याच्या प्रगतीची “गती” कायम ठेवा,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२१ एप्रिल) केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील 18 पुरस्कारांचे वितरण काल करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोविड काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून, कुटूंबापासून दूर राहून शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळे या संकटाचा आपण मुकाबला करू शकलो अशा गौरवपूर्ण शब्दात मुख्यमंत्र्यांनी याकाळात केलेल्या कामाचे कौतूक केले. ते पुढे म्हणाले की, जेंव्हा आपला राज्याचा लाडका मुख्यमंत्री म्हणून उल्लेख होतो तेंव्हा त्याचे खरे श्रेय या प्रशासकीय यंत्रणेत समर्पित भावनेने काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाते. प्रशासनात काम करत असताना अनेक अडचणी येतात, आव्हाने समोर येतात परंतू त्यातही काम करत असताना नियमांची चौकट पाळून आपण सर्वसामान्य जनतेच्या सुखासाठी किती चांगले काम करू शकतो हे लक्षात घेऊन जो काम करतो त्यातूनच चांगल्या प्रशासनाची सुरुवात होत असते.

राजकीय नेतृत्व हे राज्याच्या हिताची आणि विकासाची स्वप्नं दाखवतात परंतू ती सत्यात उतरवण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेला करावे लागते. हे करत असताना सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील दु:खाचे अश्रू पुसले जाऊन तिथे आनंदाचे अश्रू जेंव्हा येतात तेंव्हा प्रशासन चांगले काम करत आहे असे आपण मानतो. प्रशासन किती सुलभतेने काम करत आहे याचे उदाहरण देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुलभपणे केलेल्या कर्जमुक्तीचा उल्लेख केला. अलिकडच्या काळात जाहीर झालेल्या निरिक्षणांमध्ये ज्या राज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि ज्या राज्याच्या स्थुल राज्य उत्पन्नात चांगली वाढ होत आहे त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याची माहिती दिली. हे सर्व प्रशासकीय यंत्रणेतील सहकाऱ्यांमुळे शक्य झाल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न शासन करत असून यासाठी शेती आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व पारितोषिक प्राप्त अधिकारी- कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत नागरी सेवा हक्क दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आपली निष्ठा, कर्तव्यभावना राज्य आणि देशाच्या विकासासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जपावी, महाराष्ट्र हे आपल्या सर्वांचे मोठे कुटूंब आहे त्याच्या सुखासाठी काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने केले.

नविन्यपूर्ण उपक्रम योजना फ्लॅगशीप योजना म्हणून राबविण्यात याव्यात – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

प्रशासनात सहजता, गतिमानता, पारदर्शकता असली पाहिजे. गतिमानता आणण्यासाठी कालानुरूप प्रशासनात बदल केले जातात. जिल्ह्यात राज्यात जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात ते राज्यभर राबविले गेले पाहिजेत. महसूल विभागात अनेक योजना राजस्व अभियान अंतर्गत राज्यभर राबविल्या जातात. नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यासाठी मुख्यमंत्री फ्लॅगशीप योजना म्हणून राबविण्यात याव्यात, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सांगितले.

महसूल मंत्री थोरात म्हणाले, शासनाने मोफत घरपोच सातबारा, ऑनलाइन फेरफार, ई पीक पाहणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा विनामूल्य व घरपोच दिला जात आहे. गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान राबविण्यात येते. या अभियानातंर्गत सहभाग तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.

या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत प्राप्त पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावर विजय वाघमारे, सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव या वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार दिपेंन्द्र सिंह कुशवाहा, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई, पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार राहुल व्दीवेदी प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई, पारितोषिकाचे स्वरुप रोख. सहा लाख रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर , पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार अनिरूध्द बक्षी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार एस.एस.शेवाळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, राहता, अहमदनगर पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु.,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

महानगरपालिका वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पारितोषिकाचे स्वरुप रोख दहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार राधाकृष्ण बी.,आयुक्त, नागपूर महानगरपालिका, पारितोषिकाचे स्वरुप रोख सहा लाख रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार दिलीप ढोले, आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका पारितोषिकाचे स्वरुप रोख चार लाख रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

सर्वोकृष्ट कल्पना अंतर्गत शासकीय संस्था वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार गिरीश वखारे, तहसिलदार, तहसिल कार्यालय, तळोदा, नंदुरबार ,पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार मंदार कुलकर्णी, तहसिलदार, तहसिल कार्यालय, नवापूर, नंदुरबार पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार निमा अरोरा, जिल्हाधिकारी अकोला पारितोषिकाचे स्वरुप रोख वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

शासकीय अधिकारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार डॉ. राजेंद्र बी. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर, पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय पुरस्कार एकनाथ बिजवे, नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरुप रोख वीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आला.

शासकीय कर्मचारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार अजय राजाराम लोखंडे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, भडगाव नगरपरिषद, भडगाव, जळगाव,पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार निशीकांत सुर्यकांत पाटील, तलाठी, पारोळा शहर, तलाठी कार्यालय पारोळा, जळगाव, पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, देण्यात येणार आहे.

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी- ठाकरे भेट, चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच -अमोल मिटकरी 

News Desk

करुणा शर्मा प्रकरणी कोणत्याही प्रकारचे खाजगी साहित्य प्रसिद्ध/प्रकाशित करण्यास उच्च न्यायालयाचे निर्बंध!

News Desk

साताऱ्यात शिवशाही-खासगी बसमध्ये धडक, ५० जण जखमी

News Desk