HW News Marathi
महाराष्ट्र

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य! – उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोना अजून संपलेला नाही, मास्कची सक्ती कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय, मात्र आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. साथ शिखरावर असताना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील परंतु आता लाट कमी होत असताना लसीकरण वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ फेब्रुवारी) दूरदृश्य प्रणालीद्वारे केले.

अलिबाग तालुक्यातील उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे,आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती योगिता पारधी, खासदार सुनिल तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र कुरा, सहाय्यक अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, सरपंच अनिता गोंधळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी आमदार सुरेश लाड, सभापती बबन मनवे, महेंद्र घरत, पदाधिकारी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “लसीकरणानंतरही कोरोना लागण होते पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचविण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्त्वाची आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील रुग्णालयांचे नूतनीकरण, नवीन रुग्णालयांचे उद्घाटन, श्रेणीवर्धनाचे जास्तीत जास्त काम महाराष्ट्रात झाले. आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करावी लागली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली. उद्योग-व्यवसायाचा विकास करताना निरोगी आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे भूमिपूजन संपन्न होत आहे. शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयी सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय उभे करीत आहोत, त्याचबरोबर अपघातग्रस्त भागात ट्रॉमा केअर सेंटर उभे करीत आहोत, याचे समाधान वाटत आहे. अनेकांच्या अनेक मागण्या असतात. मात्र, नुसत्या मागण्या करून काही होत नाही तर त्या मागण्यांच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा करावा लागतो. या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या यशस्वीही झाल्या. मुंबई-पुण्याच्या सीमा लाभलेल्या या जिल्ह्याला भविष्यात चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल असे सांगून शेवटी ज्यांचे या रुग्णालय उभारणीस सहकार्य लाभले त्या सर्वांना धन्यवाद. या महाविद्यालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य राज्य शासनाकडून दिले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की, “एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पाची आज सुरुवात होत आहे. महाविद्यालय काढणे तशी अवघड गोष्ट नसते, मात्र वैद्यकीय महाविद्यालय काढणे ही अवघड गोष्ट आहे. कारण त्यासाठी कमीत कमी 500 ते 700 बेड्सचे हॉस्पिटल असावे लागते आणि वैद्यकीय कर्मचारी वर्ग व साधनसामग्री लागते. त्यात किमान 500 कोटींची गुंतवणूक सुरुवातीला करावी लागते. ती गुंतवणूक केल्यानंतर महाविद्यालयासाठी वेगवेगळ्या सुविधा उभाराव्या लागतात. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कर्माचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारावी लागतात. हे अवघड काम खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, राज्य सरकार व सरकारमधील संबंधित मंत्री मिळून करीत आहेत. या सर्वांचे तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांचे मी अभिनंदन करतो. या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे.

ते पुढे म्हणाले की, “मागील दोन वर्षांत कोविड संकटात रुग्णालयांची, अद्ययावत आरोग्य सोयी-सुविधांची गरज किती आहे, ते आपल्याला कळले. अशी रोगराई आल्यानंतर काय होतं, हे आपल्याला जाणवलं. या काळात लोकांनी मुंबई सोडली आणि गावाला यायला लागले. गावाला येणारी आकडेवारी आपण पाहिली तर ती लाखोंच्या घरात होती. नेहमी मुंबईकरांचे स्वागत करणारे गावकरी याकाळात स्वागत करण्यास इच्छुक नव्हते. मुंबईवरून उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात सुरुवातीला लोक पायी निघाले. कामगारांची ती अवस्था पाहून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बसेसची व्यवस्था करून दिली. केंद्राने रेल्वे द्याव्यात यासाठी पाठपुरावा केला. या सर्व संकटाच्यापाठी होता एक रोग. या एका रोगाने संबंध जग आणि देशाला संकटात ढकलले. कोविडमुळे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज तसेच आरोग्य सुविधांची किती गरज आहे, याचा अंदाज आपल्याला आला.”

या सगळ्या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम केले. अनेकांनी आपले प्राण गमावले. पण महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असे की, संकट आल्यानंतर लोक बाकी सगळं विसरून संकटावर मात करण्यासाठी काम करतात. तेच काम आज मला इथे होताना दिसत आहे. इथे वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल उभारले जात आहे. महाविद्यालय सुरू होणार आहे, यासाठी 76 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियाही पूर्ण केली आहे. ज्यांनी ज्यांनी या कामात पुढाकार घेतला, त्या सर्वांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो, असे सांगून पवार पुढे म्हणाले, हा जिल्हा जागरूक जिल्हा आहे. वेळप्रसंगी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी कष्ट करणाऱ्यांचा हा जिल्हा आहे. उत्तम शेती आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांचा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्याने अनेक संकटांवर आजवर मात केली आहे. नेतृत्वाची खाण असलेला हा जिल्हा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा बारकाईने अभ्यास करणारे देशाचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख देखील याच जिल्ह्याचे होते. सी.डी. यांच्यासारखेच नारायण नागो पाटील, बी.व्ही. पाटील, दत्ता पाटील अशी अनेक नावे यानिमित्ताने घेता येतील. अशा या जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकार आणि इतर सहकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. एका ठरलेल्या काळात हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी आशा करतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याचे महत्त्वाचे केंद्र बनेल. असे म्हटले जाते की, रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असते. या माध्यमातून या वास्तूमध्ये ईश्वरसेवा घडेल, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गरजू, गरीब व्यक्तीची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय. प्रत्येकाने अशा वंचित लोकांसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करावी. या महाविद्यालयाच्या माध्यमातून मिळणारी सेवा ही खूप महत्त्वाची असेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या भाषणाचा संदर्भ देत भारतीय जनमाणसांची सेवा हीच खरी देशसेवा, ईश्वर सेवा असून दारिद्र्य, अज्ञान, रोगराई यावर मात करण्यासाठी केलेले काम हीच भारतमातेची सेवा असे पंडित नेहरूंनी म्हटल्याचे सांगितले. गाडगे महाराजांनीही सांगितले की, देव दगडात शोधू नका, गरीब माणसाला मदत करा, त्यांचे दुःख दूर करा आणि मग त्यांच्या डोळ्यात बघा तिथे देव दिसेल. गोरगरिबांसाठी असे स्वप्न खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाहिले आणि आज हा महत्वपूर्ण दिवस आपल्या सर्वांना लाभला आहे.

शासनाने कोविड संकट काळात खूप चांगले काम केले. या काळात सर्वांनाच खूप शिकायला मिळाले. एकमेकांच्या सहकार्याने या संकटाचा सर्वांनी सामना केला. देशात सर्वोत्तम काम महाराष्ट्राने केले. सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी रुग्णालयांनी कौतुकास्पद काम केले, सेवा केली, हीच खरी ईश्वरसेवा, देशसेवा आहे. भविष्यात या रुग्णालयाच्या माध्यमातून आणि गरिबांसाठी मोठी सेवा दिली जाणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे सांगून या ठिकाणी भविष्यात नर्सिंग कॉलेज व्हावेत तसेच हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होवून उद्घाटन सोहळाही लवकरच संपन्न होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरीब, गरजू लोकांना चांगला लाभ मिळत असून या योजनेची व्याप्ती वाढवावी आणि शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा मिळावी, ही शासनाची जबाबदारी आहे, त्यासाठी या शासनाकडून अधिकाधिक प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. मेडिकल टुरिझमसाठी रायगड जिल्ह्यात खूप चांगली संधी असून अशी व्यवस्था निर्माण झाल्यास येथील भूमीपुत्रांना, स्थानिकांनाही रोजगार मिळविता येऊ शकतील, असे ते शेवटी म्हणाले.

पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, रायगडकरांचे अनेक वर्षापासूनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. सन 2010 मध्ये राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री व विद्यमान खा. सुनील तटकरे यांनी या महाविद्यालयाची घोषणा केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री व रायगड जिल्हा पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करत असताना या महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती करण्याची मला संधी मिळाली, याचा अभिमान आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण व अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये आपले भविष्य घडविणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातून यशस्वी वाटचाल करता येणार आहे. यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी शासकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांविषयी थोडक्यात विवेचन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रायगडकरांची गेल्या अनेक वर्षांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे.

ही स्वप्नपूर्ती होत असताना या महाविद्यालयाविषयी त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम यंत्रसामुग्री व पद निर्मितीस शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी तब्बल 406 कोटी 96 लाख 68 हजार 336 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील जवळपास 52 एकर जमीन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या रु.61.68 कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे. त्यानुसार वर्षनिहाय व पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 500 खाटांच्या रुग्णालयाकरिता नियमित 496 पदे त्याचप्रमाणे गट-क ची 99 काल्पनिक पदे आणि गट-ड ची 477 कंत्राटी पदे बाह्ययंत्रणेद्वारे, अशी एकूण 1 हजार 72 पदे 4 टप्प्यात निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, वैद्यकीय उपकरणे खरेदीकरिता 2 कोटी 98 लाख 53 हजार 798 रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग सुरु करण्याकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा अपुरी असल्यामुळे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ, अलिबाग यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पालकमंत्री तटकरे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्यासाठी सर्व स्तरावर मोलाचे सहकार्य करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख या सर्वांचे त्यांनी आभार मानून रायगड जिल्ह्यात आरोग्य सुविधेच्या मूलभूत हक्कापासून कोणीही वंचित राहणार नाही व त्यातून आरोग्य स्वयंपूर्ण रायगड” हा यशस्वीततेकडे वेगाने मार्गक्रमण करील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, अलिबागजवळ उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय साकारते आहे, हा रायगडवासियांसाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे. दुर्धर आजार, मोठ्या शस्त्रक्रिया यांसाठी आता मुंबईत जाण्याची आवश्यकता नाही. रायगडवासियांना जिल्ह्याच्या ठिकाणीच ही सुविधा लवकरच या रुग्णालयात मिळेल, याची खात्री आहे. खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने आवर्जून जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माणगाव येथेही लवकरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू होणार आहे. विशेषतः महिलांसाठी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध या निमित्ताने होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, या वैद्यकीय महाविद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी नियोजित वेळेत पूर्ण करण्याकडे आमचा कटाक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी विशेष बाब म्हणून आरोग्य खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना जिल्हा व तालुका स्तरावर मिळण्यासाठी व सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून आवश्यक आरोग्य सुविधा आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यास सांगितले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील जनतेला निरोगी ठेवण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी पाहिलेल्या स्वप्नपूर्तीची ही सुरुवात आहे तर लवकरच उद्घाटन सोहळ्यासाठीही असेच एकत्र जमू. रायगडमध्ये पर्यटनाला वाव आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडको, जे.एन.पी.टी अशा विविध विकासात्मक बाबी येथे आहेत. आयुष आणि ॲलोपथी अशा एकत्र आरोग्य सुविधा एकाच छताखाली आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. आजच्या काळात जिल्ह्यासाठी सर्व सुविधायुक्त रुग्णालये ही काळाची गरज बनली आहे. जिल्हा तेथे शासकीय महाविद्यालय या संकल्पनेस सर्वच स्तरातून मिळालेला पाठिंबा हा निश्चितच अभिनंदनीय आहे. शासन प्रत्येक गरजू व्यक्तीला आवश्यक ती आरोग्य सुविधा देण्यास कटिबद्ध आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मनोगतातून रायगड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आपण कटिबद्ध असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व मिळून येथील विकासकामे पूर्ण करू, अशी आशा व्यक्त केली. त्यांनी माणगाव येथील 100 खाटांचे विशेष रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरला राज्य शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल शासनाचे विशेष आभार मानले. तसेच भविष्यात 100 खाटांचे आयुर्वेदीक रुग्णालय साकारण्यासाठीही शासनाचे पाठबळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

“गरूडझेप स्पर्धा परीक्षा ॲप” चे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “गरूडझेप स्पर्धा परिक्षा ॲप”चे उद्घाटन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. याबरोबरच या केंद्रासाठी प्रातिनिधीक स्वरूपात स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संचही खासदार शरद पवार यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला. रायगड जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता गरूडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले असून दर शनिवारी व रविवारी प्रत्यक्ष व ऑनलाईन माध्यमातून अनेक विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत.

याप्रसंगी महाविद्यालय सुरू होण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल आरसीएफचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास कुलकर्णी यांचा विशेष सत्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात भूमिपूजनाने व कोनशिला अनावरणाने झाली. मुद्रा गाडे-जोशी यांनी महाराष्ट्र गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता पोलीस बँड पथकाने वाजविलेल्या राष्ट्रगीताच्या धूनने करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्यांची निष्ठा तपासा…नाहीतर ते आपल्याविरोधात काम करतील !

News Desk

‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर

News Desk

मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या हाकणे बंद करावे !

News Desk