HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांना लोकल प्रवास पडला महागात, कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई | कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली मुंबईची लोकल अद्याप सामान्य लोकांसाठी सुरू झाली नाही. यामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी करत मनसेने काल (२१ सप्टेंबर) सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास केला होता. या आंदोलन प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चार जणांविरुद्ध कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’च्या माध्यमातून पोलिसांना कुठून कुठपर्यंत प्रवास केला हे शोधून दाखवावं, असा थेट इशारा पोलिसांना दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांनी सकाळी ७ च्यादरम्यान शेलू रेल्वे स्थानक ते नेरुळ रेल्वे स्थानक असा प्रवास केल्याचं शोधून काढले होते. त्यानुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, विना तिकीट प्रवास तसंच रेल्वे अधिनियम कलम 147, 153, 156 अन्वये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“आम्हाला अजून अटक झालेली नाही. आम्ही स्वत: पोलिसांना शरण जात आहोत. प्रवास केला म्हणून अटक होते ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असावी, अन्यथा दंड देऊन सोडलं जातं. सरकारचा किती आकस आहे, हे यातून दिसून येतं. आंदोलन हे प्रतिकात्मक होतं. ते फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी होतं. त्यावर सरकार चर्चा करायला तयार नाही. आमच्यावर तुमचा राग आहे तर मग रेल्वे प्रवासी संघटनांसोबत चर्चा करा. पण आंदोलन करु नये म्हणून ही सर्व हुकुमशाही सुरु आहे. लोकशाहीत चर्चा होऊन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून मार्ग काढले जात नाहीत,” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी पोलिसांना शरण झाल्यानंतर दिली आहे.

Related posts

भाजप नेत्याच्या घरातून १७ देशीबॉम्ब तर ११६ जिवंत काडतुसे जप्त

News Desk

नासाने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणून यशस्वी !

News Desk

राहुलची सभा संपताच मंडप कोसळला

News Desk