HW News Marathi
महाराष्ट्र

लोकशाही विरोधात भारतीय जनता पक्षाचा कट ! सचिन सावंत

मुंबई | भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला असून भाडोत्री आयटी सेलच्या माध्यमातून रातोरात ट्विटर, फेसबुकवर अकाऊंट उघडून बदनामी वा अपप्रचाराची मोहिम राबवण्याचे उपद्व्याप सुरु आहेत. हा नवा दहशतवाद लोकशाही विरोधात रचलेला कटच आहे. या नव दहशतवादाचे समुळ उच्चाटन झाले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या सोशल मीडिया रॅकेटसंदर्भात सचिन सावंत यांच्या नेतत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली, शिष्टमंडळात पक्ष प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, रत्नाकर सिंग उपस्थित होते. या बदनामी मोहिमेचा टविटरवरुन मिळालेला डेटा पुढील तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला आहे.पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये या कंपन्यांची नावं, सोशल मीडियावरील खऱे व फेक अकाऊंटसची माहिती आहे. याची चौकशी करु, असे आश्वासन पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले आहे, असे सावंत म्हणाले.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम पद्धतशीरपणे चालवण्याचा नवा ट्रेंड आणला असून हा नव दहशतवाद आहे. याच माध्यमातून रातोरात हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामीची मोहीम राबवली जाते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास असे दिसते की महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान आहे.

या ट्विटच्या असामान्य पॅटर्ननुसार फेसबुक, ट्विटरचा कोणताही सामान्य वापरकर्ता 3 महिन्यांत 40 हजार ट्वीट/पोस्ट करू शकत नाही. यातील बहुतांश ट्विटर हँडलने दर मिनिटाला २५ ट्विट्स केल्याचे दिसते. हे सर्व ट्विट साधारणपणे एकाच विषयाच्या संदर्भात करण्यात आलेत ते म्हणजे सुशांतसिंग राजपूत (SSR). त्यांचे हॅशटॅगही कॉमन आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यावसायिक एजन्सींच्या मार्फत हे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री हे आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठीच मुंबई पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असे चित्र रंगवण्याचा या मोहिमेचा एकमेव उद्देश होता. भाड्याने घेतलेल्या सोशल मीडियावर ट्रेंड सेट करण्याची ही पद्धत असून याच माहितीच्या आधारावर गोदी न्यूज चॅनेल्स जोरजोरात अपप्रचार करतात. सुशांतच्या आत्म्याशी बोललो असल्याचा दावा करणारा एक व्हीडीओ यूट्यूब चॅनेलवर व्हायरल झाला होता. गोबेल्स तंत्राची ही विकसित आवृत्ती असून त्यावर आरुढ होत भाजपाचे नेते कृत्रीम जनमत बनवत आहेत, हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, असे सावंत म्हणाले..

भाजपाच्या या नव दहशतवादाचा काँग्रेसने भांडाफोड करून यामागील खरा मास्टरमाइंड शोधण्यासाठी एसआयटीची स्थापना करून सोशल मीडीयाचे रॅकेट उद्धवस्त करावे अशी मागणी केली होती. मुंबई पोलिसांनीही तपास करत अशा ८० हजार बोगस अकाऊंटच्या माध्यमातून बदनामीची मोहिम राबवल्याचे उघड केले आहे. मिशीगन विद्यापीठानेसुद्धा अशा मोहिमेत भाजपाचा हात असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. फेसबुक व भाजपाच्या अभद्र युतीचा पर्दाफाशही वॉल स्ट्रिट जनरलने उघड केला होता. पालघरमधील दोन साधूंच्या हत्यावेळी, दिल्ली दंगलीतही हीच मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली होती आणि भविष्यातही अशाच पद्धतीने हे उपद्व्याप करुन समाजात अशांत पसरवली जाऊ शकते, तसेच विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिध्द गझलकार इलाही जमादार यांचे निधन

News Desk

आदित्य ठाकरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

swarit

महिला दिनाच्या दिवशी अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले!

News Desk