HW News Marathi
महाराष्ट्र

नव्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करा! – अजित पवार

पुणे । पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या माध्यमातून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते बारामती पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प. अध्यक्ष निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, न.प.अध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, शासकीय इमारती जनतेने दिलेल्या कराच्या पैशातून उभ्या राहतात, त्याला जनतेच्या घामाचा सुगंध असतो. त्यामुळे इमारतीत काम करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि इथे येणाऱ्या व्यक्तीच्या करातून आपल्याला पगार मिळतो याची जाणीव ठेवावी. काम करताना लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करण्याची आवश्यकता आहे. विकासाची कामे करताना गोरगरीबांनाही त्याचा उपयोग होईल याची दक्षता घेण्यात येईल.

पंचायत समितीच्या इमारतीत बँकेसह इतरही सुविधा देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीतून दूरदृश्य प्रणालीची सुविधा देण्यात येणार आहे, त्यामुळे कामकाज गतिमान होण्यास मदत होईल. ही इमारत राज्य आणि देशातील पंचायत समितीची भव्य इमारत असावी. इमारतीच्या माध्यमातून चांगले काम उभे राहावे.

पंचायत समितीच्या कामकाजाचे वेगळे महत्त्व आहे. लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगले कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यामुळे राज्यात पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात रुजली. याच माध्यमातून सत्ता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची ही परंपरा यशस्वी झाली. लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण होऊन लोकशाही मजबूत झाली.

बारामती शहर आणि तालुक्याचा वेगाने विकास

बारामती शहरात अनेक कार्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुंदर इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. कवी मोरोपंतांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समितीची सर्व सुविधायुक्त वास्तू, अद्ययावत क्रीडा संकुल, पाणी पुरवठा योजना आदी सुविधा जनतेसाठी निर्माण करण्यात येत आहे.

बारामती बसस्थानकाचे काम पूर्ण होत आहे. हे बसस्थानाक राज्यातील प्रमुख स्थानकात गणले जाईल. बारामती हे शिक्षणाचे ‘हब’ म्हणून ओळखले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा दूर करण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.

बचत गटांचे सबलीकरण आणि गरजूंना हक्काचे घर-हसन मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महिला समृद्धीसाठी स्वयंसहायता बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. गरजूंना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी महाआवास अभियानांतर्गत ४ महिन्यात ५ लाख घरे बांधण्यात आली असून यावर्षीदेखील ५ लाख घरे बांधण्याचा संकल्प केला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ४० हजार किलामीटर रस्ते तयार येणार आहेत, त्यापैकी १० हजार किलोमीटरच्या रस्त्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्व.आर.आर. पाटील यांच्या स्मृती दिनी सुंदर गाव स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या ग्रामीण गावातील घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंधराव्या वित्त आयोगातील निधी ग्रामपंचायतीसोबत काही प्रमाणात जि.परिषद आणि पंचायत समित्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्याने यशस्वीपणे राबविलेली पाणंद रस्ते आणि गोठे बांधण्याची योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. नगरोत्थान योजनेप्रमाणे मोठ्या गावांचा विकास करण्याची योजना आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामतीचा उत्तम कामासाठी लौकिक-शरद पवार

खासदार पवार म्हणाले, सामान्य माणसाच्या हृदयात जागा असलेला राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देशात आदराने आणि अभिमानाने घेतले जाते. इतिहासातील विविध साम्राज्ये राजांच्या नावाने ओळखली जातात. याला अपवाद शिवाजी महाराजांचे राज्य होते. हे राज्य रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले गेले. महाराजांच्या जन्मदिवशी चांगली इमारत जनतेच्या सेवेसाठी उभे राहिली आहे.

बारामतीमध्ये अनेक उत्तम वास्तू उभ्या राहिल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शहरात असे चांगले काम होत आहे. प्रत्येक काम दर्जेदार असायला हवे आणि स्वच्छतेकडेही लक्ष दिले जायला हवे. चांगल्या वास्तू असल्याने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना तेथे जावेसे वाटते. संस्था नेटक्या आणि स्वच्छ कारभाराच्या असावयास हव्या. इथे येणाऱ्या माणसाच्या मनात संस्थेबद्दल विश्वास वाटायला हवा. असे चांगले काम बारामतीला होत आहे.

पंचायत राज कायदा जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. ही व्यवस्था महाराष्ट्राने चांगल्यरितीने राबवली आहे. चांगली परंपरा आपल्या पाठीशी आहे. ती कायम राखण्याची काळजी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पंचायत समितीचे उपसभापती रोहित कोकरे, एकात्मिक पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पंचायत समितीचे सदस्य, नागरिक आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर…१ जानेवारीपासून लागू होणार सातवा वेतन आयोग

News Desk

राज्यात ८ नवे कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांचा आकडा ९७ वर

swarit

#CoronaVirus : मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या दृष्टीने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

swarit