HW News Marathi
महाराष्ट्र

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील! – अजित पवार

मुंबई। कोरोना महामारी, तौक्ते, क्यार, निसर्ग चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करुन शासनाने सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. मुरुग वाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंबे) ३.५ कि.मी. लांबीच्या टेट्रापॉड आणि ग्रोयन धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे या भागातील धूप कमी होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते आज मिऱ्या बंदर येथील कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सांमत, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितमकुमार गर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कोनशिलेचे अनावरण करुन उपमुख्‍यमंत्र्यांनी बंधाऱ्याच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती करुन घेतली.

यावेळी ते म्हणाले की, या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे पांढऱ्या समुद्र किनाऱ्याची धूप थांबणार आहे. समुद्र किनारी असणाऱ्या जमिनीचे, शेतीचे, गावांचे संरक्षण होणार आहे.महत्त्वाचं म्हणजे समुद्राला त्याच्या सीमेत अडविण्याचं काम हा बंधारा करेल. या प्रकल्पासाठी जवळपास 190 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पाच्या सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीचीही तरतूद तात्काळ करण्यात येईल. या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम दोन वर्षात पूर्ण होईल अशी हमी त्यांनी यावेळी दिली. बंधाऱ्याचे व सुशोभीकरणाचे काम उत्कृष्ट व दर्जेदार झाले पाहिजे. पुढची 50 वर्षे डोळयासमोर ठेवून चांगल्या प्रतीचे काम झाले पाहिजे. या बंधाऱ्याचा उपयोग या भागातील समुद्रकिनारे वाचवण्यासाठी होईल. जमीन, शेतीचं, गावांचं संरक्षण करतानाच, इथला निसर्ग, पशुपक्षांचा अधिवास, कांदळवनांचं संरक्षण करण्यातही, हा बंधारा महत्त्वाची भूमिका बजावेल.

शहराच्या सार्वजनिक बाबींच्या विकासासाठी शासनाला स्थानिकांकडून जमिनी घ्याव्या लागतात. रत्नागिरीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करताना स्थानिकांनी याबाबत सहकार्य करावे. त्यांच्या सहकार्याबद्दल योग्य तो मोबदला दिला जाईल असेही ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्याचा प्रशासकीय व औद्योगिकदृष्टया सर्वांगीण विकास

रत्नागिरी जिल्ह्याचा प्रशासकीय व औद्योगिकदृष्ट्या सर्वांगीण विकासाबद्दल बोलताना ते म्हणाले की, रायगड येथील रेवस ते सिंधुदुर्ग येथील रेड्डी महामार्गासाठी 9 हजार 570 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना व त्याअंतर्गत दोन्ही जिल्ह्यात साधनसंपत्तीचा वापर करुन उद्योगविकासासाठी 100 कोटी देण्यात आले आहेत . तसेच श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रुपये, राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराचा विकास, रत्नागिरीत भगवती इथे क्रूझ टर्मिनलची उभारणी, अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायासाठी मोठा प्रमाणावर निधी उपलब्ध, तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी सर्व सोयीसुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध अशा प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

रत्नागिरीच्या पर्यटनाविषयी बोलताना ते म्हणाले की, रत्नागिरीच्या किनाऱ्यांवरच्या पर्यटनवाढीलाही याचा उपयोग होईल. रत्नागिरी जिल्ह्याला २३८ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा किनारा जगातला सर्वात स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपन्न किनारा आहे. गावखडीचा किनारा,आरे-वारेचा किनारा, गणपतीपुळ्याचा किनारा, प्रत्येक किनारा हा अप्रतिम, सुंदर आहे. रत्नदुर्ग किल्ला, पांढरा समुद्रकिनारा, औषधी वनस्पतींनी समृद्ध असा मिऱ्याचा डोंगर, इथून जवळ असलेलं अॅक्विरियम, स्कुबा डायव्हिंगची सोय अशा अनेक गोष्टींचा विकास आणि प्रसिद्धी, प्रभावीपणे केल्यास, रत्नागिरीत निश्चितपणे पर्यटकांचा ओघ वाढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या दोन वर्षात, निसर्ग, तौक्ते अशा अनेक वादळांनी कोकणच्या किनारपट्टीवर नुकसान केले. अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळल्यानेही मोठे नुकसान झाले. या संकटकाळात शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, फळबागायतदारांच्या, मच्छिमारांच्या, दुकानदारांच्या, व्यापाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यासाठी, एनडीआऱएफच्या निकषांच्या पलिकडे जाऊन आपण आपत्तीग्रस्तांना मदत केली.

कोराना काळात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून उपमुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी कोरोना प्रतिबंधक सूचनांचे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषत: 31 डिसेंबर रोजी नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, याकरिता पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नये अशी कळकळीची व आग्रहाची विनंती त्यांनी यावेळी केली.

यावेळी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी आपल्या मनोगतात मुंबईच्या नरिमन पाईंटला ज्या प्रमाणे पर्यटक भेट देतात त्याचप्रमाणे येथेही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतील. हा बंधारा भविष्यात रत्नागिरीचे वैभव म्हणून नावारुपाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम मर्यादित उपस्थितीत पार पडला. यावेळी कोरोना प्रतिबंधक सूचनांचे पालन करण्यात आले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी अंतिम सुनावणी

News Desk

लोणार सरोवराचे पाणी लाल गुलाबी होण्याचे कारण काय?

News Desk

राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अमोल कोल्हे म्हणाले, अभिमान तर असेल, पण…

News Desk