HW News Marathi
महाराष्ट्र

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ! – देवेंद्र फडणवीस

पुणे । आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२२-२३ च्या (65th Maharashtra Kesari Tournament) पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला क्रीडा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल. मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.

मिशन ऑलिम्पिक सुरू करण्यात येईल
कै.खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्यानंतर महाराष्ट्र पदक मिळविणाऱ्या मल्लांना तयार करण्यात मागे राहिला. ही उणिव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तराव पदक जिंकणारा किमान एकतरी मल्ल महाराष्ट्राचा असेल अशी मोहिम सुरू करण्यात येईल. महिलांच्या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुढाकार घेतल्यास शासन त्यालाही सहकार्य करेल.

कै.मामासाहेब मोहोळ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांना मामासाहेबांचे सुपूत्र माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्याकडून मानाची गदा दिली जाते. हा मान मिळविण्याकरिता लाल मातीचे आणि मॅटवरील पैलवान मोठ्या प्रमाणात कुस्ती खेळतात, संघर्ष करतात आणि त्याचा आनंद सगळ्यांना अनुभवायला मिळतो. अत्यंत रंजक महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपल्याला पहायला मिळाल्या असे सांगून त्यांनी यशस्वी पैलवान, कुस्तीप्रेमी नागरिकांचे अभिनंदन केले. मुरलीधर मोहोळ यांनी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान-क्रीडामंत्री

डोळ्याचे पारणे फेडणारी स्पर्धा संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केल्याबद्दल कौतुक करून क्रीडामंत्री महाजन म्हणाले, कुस्ती हा खेळ मेहनतीचा आणि बुद्धीचातुर्याचा आहे. पैलवानांना खूप कष्ट करावे लागते. आयुष्यभर कष्ट करून देशाला नाव मिळवून देणाऱ्या पैलवानांना तुलनेत त्यांना मिळणारे मानधन कमी आहे. या मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान केला जाईल. शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेत १० लाखावरून ५० लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैलवानांचाही सन्मान करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.

पालकमंत्री पाटील यशस्वी स्पर्धेच्या आयोजनाबबात मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन केले. त्यांच्या प्रयत्नाने एक चांगली स्पर्धा कुस्ती प्रेमींना पहायला मिळाली असे त्यांनी सांगितले.

खासदार तडस आणि ब्रिजभुषण सिंह यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. महिलाही या क्षेत्रात ताकदीने पुढे येत असल्याने भविष्यात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात मोहोळ यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा आहे. कुस्तीसाठी राजाश्रय महत्वाचा आहे. शासनाने कुस्तीपटूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. राज्यातला प्रत्येक कुस्तीप्रेमी महाराष्ट्र केसरीची आतुरतेने वाट पहात असतो. स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीच्या प्रती असलेली आत्मियता समोर आली असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती गटातील अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखचा पराभव केला. गादी गटात पुण्याचा शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पराभव करून केला. दोन्ही गटातील विजेते महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत झाली. यामध्ये निकाली कुस्ती करत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना गदा प्रदान करण्यात आली.

फडणवीस यांच्या हस्ते कुस्तीपटू तयार करणाऱ्या पैलवान उत्तमराव पाटील यांना मानपत्रप्रदान करण्यात आले. या स्पर्धेनिमित्त ‘वेध महाराष्ट्राचा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे देशाच्या जनतेचं दुर्दैव”, अजित पवार का संतापले?

News Desk

नागपूरमध्ये रुग्णालयाला भीषण आग

News Desk

तडजोड केलेली नाही, भाजपची अडचण समजून घेतलीय !

News Desk