HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती- देवेंद्र फडणवीस

मुंबई | भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडे यांची आज (३ जून) पुण्यतिथी. त्यांच्या ७व्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीट Postal Envelope चं अनावरण करण्यात आलं. या निमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवल्या. त्याचबरोबर ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरुनही त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे

आज जर गोपीनाथ मुंडे असते तर…

महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाय. त्याचबरोबर आमच्या नेत्याचं डाक पाकीट प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार त्यांनी मानले आणि गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सत्तेसोबत संघर्ष करणं हा गोपीनाथ मुंडेंचा स्थायीभाव

काही लोक सामान्य म्हणून जन्माला येतात. पण त्याचं कार्य असामान्य असतं. गोपीनाथ मुंडे हे त्यापैकीच एक होते. मुंडे यांना लोकनेता म्हटलं जातं. ते जननायक आणि लोकनायक बनले. नाथ्रासारख्या छोट्या गावातून येऊन त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. मुंडेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेता बनवलं. त्यांच्यासोबत राज्यात आणि विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. ते नेहमी सांगायचे की सत्तेसोबत कधी समझोता केलात तर कधीही नेता बनू शकत नाही. सत्तेसोबत संघर्ष केलात तर तुम्ही नेता बनू शकता. सत्तेसोबत संघर्ष करणं हा त्यांचा स्थायीभाव होता, अशा शब्दात फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

‘गोपीनाथरावांना पाहून लोकांना विश्वास वाटायचा’ – फडणवीस

गोपीनाथ मुंडे यांनी मोठा काळ विरोधी पक्षात घालवला. पुढे युतीची सत्ता आली त्यात ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनले. त्या काळात ज्या मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत त्यांनी संपवली. गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलंच. सोबतच ते शेतकऱ्यांचे नेते होते. विधानसभेत ज्या प्रमाणे गोपीनाथ मुंडे यांना ऐकण्यासाठी सर्व सदस्यांचे कान आसुसलेले असायचे. त्या प्रमाणे संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात मुंडेसाहेबांना पाहायला, ऐकायला लोक यायचे. गोपीनाथ मुंडे सत्तेत असोत वा नसोत, त्यांचा एक रुबाब कायम होता. मुंडे यांना पाहून लोकांना आपले प्रश्न आता सुटतील असा विश्वास वाटायचा, असंही फडणवीस म्हणाले.

मुंडेसाहेबांच्या विचाराने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न

राज्यातील राजकारणासह गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय राजकारणातही आपली चमक दाखवली. म्हणूनच पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात त्यांच्याकडे त्यांचं ग्रामविकास हे आवडीचं खातं दिलं गेलं. पण नियतीला वेगळंच काही मान्य होतं. मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे विचार, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा शब्दात फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे – देवेंद्र फडणवीस

News Desk

संजय राऊतांपेक्षा आदित्य ठाकरेंना गोव्याची जास्त माहिती, नितेश राणे यांची खरमरीत टीका!

News Desk

निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायलाच हवे, आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू !

News Desk