HW News Marathi
महाराष्ट्र

“आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यावर सरकारला जाग येणार?”, फडणवीस आक्रमक

मुंबई | भांडुपमधील ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत, घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच, त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जाईल असं आश्वासन देखील दिलं. तर, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळास भेट दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, राज्य सरकारवर टीका केली व घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

“जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचं, बीएमसीचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणं योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. पण मला हे समजत नाही की आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असं वाटतं या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही, यासाठी घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्यावतीने झाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे.” तसेच, “जर फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भात जर कार्यवाही झालेली नाही, तर त्यासंदर्भात जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजणांची प्रकृती गंभीर आहे.” असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख

या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यात दिरंगाई, दुर्लक्ष झालं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे आपण मॉल, सेंटर्समधील वर्दळीवर बंधनं आणली असल्याचंही मुख्यमंत्री उद्दव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. या रुग्णालयात काही लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यांचाच या दुर्घटनेत अधिक मृत्यू झाला आहे. अशावेळी व्हेंटिलेटर बंद करणं किंवा त्याचा निर्णय घेणं कठिण असतं. मात्र, या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्वांच्या कुटुंबीयांकडे मी दिलगिरी व्यक्त करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच प्रतिक्रिया देत नाहीत त्यात आश्चर्य काय – सुप्रिया सुळे

News Desk

अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचं नाटक सुरु, फडणवीसांचा दावा

News Desk

अखेर रणजितसिंह देशमुख धनुष्यबाण सोडत पुन्हा कॉंग्रेसचा हात हातात घेणार!

News Desk