पुणे | बाणेर येथील कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा साधला. अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत युवासेना आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. देशभरातील कुलगुरुंचे हेच मत होते. इतकंच काय महाराष्ट्रातील नेमलेल्या कुलगुरुंच्या समितीचेही हेच मत होते. मात्र युवासेनेच्या हट्टासाठी राज्य सरकार त्याबाबत एकतर्फी निर्णय घेत होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्य सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाला असता. परीक्षा नसल्याचा त्यांना आज आनंद झाला असता, पण भविष्यात त्यांची डिग्री बिनकामी ठरली असती. मात्र कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत, त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा फायदाच होईल. त्यांच्या डिग्रीला किंमत राहील, असे फडणवीस म्हणाले.