HW News Marathi
Covid-19

फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र, म्हणाले…”ये पब्लिक है, सब जानती है!”

मुंबई | राजकीय नेत्यांनी एकमेकांना पत्र लिहून सल्ले किंवा टोमणे मारणे हे काही नवीन नाही आहे. सत्ताधारी पक्षातील नेते विरोधकांना पत्र लिहितात तर कधी विरोधक सत्ताधाऱ्यांना पत्र लिहितात. आजच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.

काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र सोनिया गांधी यांना पाठविले असून, त्यांना महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम याची जाणीव करून दिली आहे.

काय लिहिले आहे पत्रात?

मोदींवर टीका करणे, हे त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष्य

सोनिया गांधींना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, अगदी 13 मे रोजीच्या आकडेवारीचा विचार केला तरी देशातील एकूण कोरोना रूग्णांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण हे 22 टक्के आहे, जे सातत्याने 30 टक्के आणि त्याहून अधिक राहिले आहे. देशात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण 31 टक्के, तर सक्रिय रूग्णांचे सुद्धा 14 टक्के आहे.

त्यामुळे देशातील कोरोनाच्या स्थितीचा विचार करताना महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती सुधारली, तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल आणि देशातील कोरोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईल, याच्याशी आपण सहमत असालच. आज महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते आहे, ज्यात 1.80 कोटी वॅक्सिन्स, 8 लाखांहून अधिक रेमडेसिवीर, 1750 मेट्रीक टन ऑक्सिजन, कितीतरी वेंटिलेटर्स, बायपॅप आणि ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर्सचा समावेश आहे. असे असले तरी काही लोकांना मोदींवर टीका करणे, हे त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष्य वाटते.

राज्यातील सरकारला आणि काही माध्यमांना मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असे वाटते. आता समजा मुंबईची स्थिती पाहिली तरी येथे चाचण्या कमी, त्यातही रॅपिड अँटीजेनचे प्रमाण अधिक ठेऊन एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले. कोरोनामुळे होणारे मृत्यू सुद्धा मोठ्या प्रमाणात लपविले जात आहेत. अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू या वर्गवारीचे राज्यातील अन्य जिल्ह्यांचे प्रमाण 0.8 टक्के असताना एकट्या मुंबईत ते 40 टक्के आहे.

मुंबईत दरवर्षी सरासरी 88 हजार मृत्यू होतात. पण, 2020 या वर्षांत यात 20,719 मृत्यू वाढले. यातील 11,116 मृत्यू केवळ कोरोनाचे दाखविले. म्हणजे प्रत्यक्षात 9603 कोरोना मृत्यू दडविले. गेल्यावर्षीचा हा क्रम याही वर्षी सुरूच आहे. आता यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? आजही अंत्यसंस्कारांसाठी वेटिंग पिरिएड आहे.

देशात दररोज 4000 मृत्यू कोरोनामुळे नोंदले जात असताना त्यातील 850 हे महाराष्ट्रातील आहेत आणि सरकार आपले कौतूक करण्यात व्यस्त आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना देवाच्या आधारावर सोडून देण्यात आले आहे. ग्रामीण भागात बेडस नाही, उपचार नाही, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष आहे.

शेवटी विविध न्यायालयांना हस्तक्षेप करीत आदेश द्यावे लागले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात कोरोना संसर्ग आणि मृत्यूची स्थिती अतिशय वाईट आहे. रेमडेसिवीरच्या काळाबाजारीत सरकारी डॉक्टर पकडले जातात, तर त्यांचा पीसीआर सुद्धा मागितला जात नाही, अशी स्थिती आहे, असे सांगताना अमरावतीतील प्रकार देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिला आहे.

अर्थसंकल्पीय आकड्यांची पॅकेजमध्ये बनवाबनवी

कधीकधी लॉकडाऊन हा उपाय असतो, पण, असे करताना गरिब, उपेक्षित, शेतकरी यांना पॅकेज देणे अपेक्षित असते. अनेक छोटे राज्य मदत देत असताना महाराष्ट्रात मात्र अर्थसंकल्पीय आकड्यांची पॅकेजमध्ये बनवाबनवी करण्यात आली आहे. आपली प्रतिमा सुधारण्यासाठी समाजमाध्यमांचे टेंडर जारी केले जातात, पण, गरिबांना मदत मिळत नाही. असे असताना सुद्धा आम्ही रचनात्मक विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. संकटात सूचना करणे हे विरोधी पक्षाचे कामच असते.

पण, नकारात्मक वातावरणाची निर्मिती होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणे आवश्यक असते. केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसची किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यांनी चालणार्‍या सरकारांना सुद्धा सल्ला देणे हे काम सुद्धा सोनिया गांधींनी केले पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. आज संपूर्ण जग मोदींच्या प्रयत्नांकडे विश्वासाने पाहते आहे. त्यामुळे जगातील अनेक देश मदत देण्यासाठी पुढे आले आहेत. भारतीय वॅक्सिनला नाकारणारा काँग्रेस पक्ष आज त्यावरच राजकारण करताना दिसून येतो.

खरे तर वॅक्सिनचे उत्पादन वाढते आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात 200 कोटी वॅक्सिन उपलब्ध होणार आहेत. अर्थात भारतीय वॅक्सिनबाबतीत काँग्रेसचा विश्वास वाढतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या संकटात केवळ राजकारण न करता काँग्रेस पक्ष एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका वठवेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना ‘ये पब्लिक है, सब जानती है’, याचे स्मरण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी करून दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या वॉरियर्सना भारतीय सैन्यदलाकडून विमानातून पुष्पवृष्टी करत मानवंदना

News Desk

“माझं दिल्लीकरांना हात जोडून आवाहन आहे की…”

News Desk

‘कोर्ट’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन

News Desk