HW News Marathi
महाराष्ट्र

मागील पिढीने नाथ्ऱ्याचे नाव राज्यात आणि देशात केले, आम्ही आणखी मोठे करू – धनंजय मुंडे

नाथ्रा | लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे आणि स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी नाथ-याचे नाव राज्यात आणि देशात केले. हे नाव पुढील पन्नास वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात टिकवून अग्रस्थानी ठेवण्याची जबाबदारी आता आमची आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथ्रा येथे बोलताना काढले.

आपल्या जन्मगाव नाथ्रा येथे पूर्ण करण्यात आलेल्या २.३० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व नव्याने सुरू करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुंडे हे नाथ्रा येथे आले असता, गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात ना. मुंडे यांचे अभूतपूर्व स्वागत केले; या सत्काराला उत्तर देताना धनंजय मुंडे बोलत होते.

जवळपास २५ वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडे यांचा नाथ्रा येथे हा पहिलाच नागरी सत्कार होता. संपूर्ण गाव अगदी दिवाळी प्रमाणे सजलेले, रोषणाई व फटाक्यांच्या अतिषबाजीने नटलेले दिसत होते. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढत महिलांनी घरोघरी मुंडेंचे औक्षण करत ओवाळणी केली. त्यानंतर तब्बल एक टन वजनाचा हार घालून नाथरेकरांनी आपल्या भूमीपुत्राचे अविस्मरणीय असे स्वागत केले.

तर नाथ्रा येथील आणखी सव्वा कोटी रुपयांचा एक बंधारा, देशमुख टाकळी येथील सव्वा कोटी रुपयांचा बंधारा, दीड कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीकरण, पापनेश्वर येथील ४० लाखांचे सभागृह, वॉर्ड क्र. २ मधील ३० लक्ष रुपयांचे रस्ते व नाल्या, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक, ओपन जिम व हायमास्ट दिवे असे अंदाजे पाच कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

गावकऱ्यांशी संवाद साधताना लहानपणापासून कधीही वाटलं नव्हतं की मी मंत्री पदापर्यंत पोहचेन, खरंतर आमच्या कुटुंबाचे स्वप्न हे स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहण्याचे होते. असे सांगताना धनंजय मुंडे बालपणीच्या आठवणीत हरवले.

लहानपणी विहिरींमध्ये, नदीमध्ये पोहायला जाणे, हाती बत्ती घेऊन मासे पकडण्यासाठी रात्रभर जागणे, याबाबरोबरच आपले दोन्ही चुलते स्व. माणिकराव मुंडे व स्व. व्यंकटराव मुंडे यांच्या सोबतच्या आठवणी सांगताना धनंजय मुंडे यांना गहिवरून आले.

माझ्या आयुष्यात अविरत संघर्ष वाट्याला आला, २००२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आजपर्यंत कोणतेही पद सहज मिळाले नाही. आमदारकी साठी २००९ ते २०१९ असे तब्बल दहा वर्षे वाट पाहावी लागली, लोकांची कामे करण्यात वर्षे कशी निघून गेली कळले नाही. पण २०१९ मध्ये जेव्हा मी विधानसभेला निवडून आलो तेव्हा माझ्या आईला जितका आनंद झाला होता तितकाच आनंद माझ्या संपूर्ण गावाला झाला होता, हे सांगताना धनंजय मुंडे यांचे डोळे भरून आले होते.

अनेकदा लोक मला म्हणतात की माझ्या कामातून, वागण्यातून अनेकांना स्व. पंडित अण्णा व स्व. मुंडे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा भास होतो; पण खरंतर मी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळपास सुद्धा नाही; पण स्व. अण्णांनी केलेली लोकसेवा, या भागातील लोकांना दिलेले प्रेम व स्व. मुंडे साहेबांनी राजकारण व समाजकारणातून विकासाची राबवलेली दूरदृष्टी याचा अवलंब करून मी त्यांच्या प्रमाणेच या भागातील व गावातील लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करत राहीन असे धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

गेल्या एक दोन वर्षात या भागात चांगला पाऊस झाल्याने उसाचे उत्पादन वाढले आहे, या भागातील ऊसाचे पूर्ण गाळप व्हावे यासाठी पुढील सिझन पासून मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखाना सुरू होणार असल्याची घोषणाही धनंजय मुंडे यांनी आपल्या जन्मगावातून केली.

मुंडे या नावाचा राज्यात आणि देशात दबदबा आहे, पण या नावाला शोभेल असे काम गावासाठी आजवर करता आले नाही. गावाने नाव दिले, ओळख दिली, प्रेम दिले, विश्वास दिला, कोणतेही संकट आले तरीही लोकांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम मी कदापि करणार नाही; हा विश्वास देताना पुनर्जन्म जर खरंच होत असेल तर पुन्हा या नाथ्ऱ्याच्या मातीतच जन्म घेईन असे म्हणताना देखील धनंजय मुंडे यांचे डोळे पाणावले होते.

जि. प. गटनेते अजय मुंडे यांनी बंधू धनंजय मुंडे यांनी व सर्वच भावंडांनी गेल्या काही वर्षात सहन केलेल्या राजकीय त्रासावर प्रकाश टाकला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर खलनायक ते नायक हा प्रवास करताना धनुदादांनी कामांची धडाडी, लोकांना आपलेसे करणे त्याचबरोबर विरोधक जरी दारावर आला तर त्याचेही काम दुजाभाव न ठेवता करून देणे, ही वृत्ती जोपासली. आज त्यांची हीच वृत्ती आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा देते असे सांगत कर्तबगार भावाच्या बाबतीतील आपल्या भावनांना अजय मुंडेंनी वाट मोकळी करून दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा, उदयनराजेंची मागणी

News Desk

ओमिक्रोनबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती!

News Desk

‘डेल्टा प्लस’चे 10 रूग्ण वाढले एकूण रूग्णसंख्या आता 76 च्या घरात!

News Desk