मुंबई | कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जाणार नाही. ही ऑनलाईन ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळात उपलब्ध असणार असून रविवारी ही सेवा उपलब्ध नसणार आहे. मात्र टप्प्याटप्प्याने त्याची वेळ वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
नांदेड, भंडारा, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आला आहे. गेले काही दिवस प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली. आता मात्र राज्यभर सर्वत्र सेवा सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे ४०० हून अधिक रुग्णांना या सेवेमार्फत उपचार देण्यात आले आहेत.
या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईल याचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो. थेट व्हीडीओ कॉन्फरन्सिंग, लिखीत संदेश याद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करता येईल.
कशी वापरता येईल सेवा:
१) नोंदणी करून टोकन घेणे- त्यासाठी मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी करत येईल. त्यावर त्यावर ‘ओटीपी’ आल्यानंतर त्या माध्यमातून रुग्णाने नोंदणी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर टोकनसाठी विनंती करायची. आजाराबाबत काही कागदपत्रे, रिपोर्ट असतील ते अपलोड करता येतील. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाचा ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होईल.
२) लॉगईन करण्यासाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येईल. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकच्या आधारे लॉगईन करता येईल.
३) वेटींग रुम- वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टीवेट) होईल. त्यानंतर व्हीडओ कॉल करता येईल.
४) तुम्हाला डॉक्टर स्क्रीनवर दिसतील. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.