HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंवर विनयभंगाचा गुन्हा?

मुंबई : ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्यावर चक्क विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचे वृत्त सध्या गाजत आहे. अर्थात खडसेंनी त्याचा इन्कार केला असला, तरीही लोकांना हे प्रकरण नेमके काय आहे, हे जाणून घ्यायचे आहे.

‘असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या दिल्लीस्थित प्रतिष्ठित संस्थेने एकनाथ खडसे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचे अहवालात म्हटले होते. खडसे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या आधारे त्यांनी हा दावा केला होता. प्रतिज्ञापत्रात खडसे यांनी स्वत:च आपल्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचे म्हटले होते, असे संस्थेचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक मागोवा घेतला असता असे लक्षात आले की, एकनाथरावांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ अन्वये सामाजिक, राजकीय आंदोलनात सहभाग घेतल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र, २०१४मध्ये मुक्ताईनगरमधून (जि. जळगाव) विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी प्रतिज्ञापत्र भरताना घाईगडबडीत नजरचुकीने त्यांनी ३५३ ऐवजी ३५४ असे कलम नमूद केले. ३५४ हे कलम महिलेच्या विनयभंगाचे आहे. ३ ऐवजी ४ असा एका आकड्याचा फरक खडसेंना इतका महागात पडला.

‘‘हा अहवाल पाहून मला धक्काच बसला..,’’ खडसे सांगत होते, ‘‘आपल्याविरुद्ध महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा असल्याचे मला तरी माहीत नव्हते. जेव्हा मी माहिती घेण्यास सुरुवात केली आणि कागदपत्रे गोळा केली, तेव्हा मला खरा प्रकार उलगडला. कापसाला भाव देण्याप्रकरणी २००५मध्ये तत्कालीन मंत्री विमल मुंदडा यांच्याविरुद्ध आम्ही आंदोलन केले होते. त्याप्रकरणी राजकीय व सामाजिक आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दलचे ‘कलम ३५३’अन्वये माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा रीतसर उल्लेख मी २०१४च्या प्रतिज्ञापत्रात केला होता. पण तो लिहिताना गडबड झाली आणि ‘कलम ३५३’ऐवजी नजरचुकीने ‘कलम ३५४’ लिहिले गेले. ती चूक झाली ती पोलिसांनी चुकीची माहिती दिल्याने. परिणामी प्रतिज्ञापत्रात ‘कलम ३५४’ राहूनच गेले आणि त्याआधारे ‘एडीआर’च्या अहवालात माझे नाव विनाकारण लिहिले गेले. या घटनेचा मला खूप मन:स्ताप झाला. माझ्याबद्दल विनाकारण गैरसमज पसरला गेला. लिहितानाच्या निष्काळजीपणाची चूक महागात पडली..’’ विशेष म्हणजे, २००५मधील त्या खटल्यातून खडसे जानेवारी २०१५मध्येच दोषमुक्त झालेले आहेत!

प्रतिज्ञापत्राच्या आधारे देशभरातील ५१ लोकप्रतिनिधींविरुद्ध महिला अत्याचाराचे गुन्हे असल्याची माहिती देणारा अहवाल बुधवारी प्रकाशित झाला होता. त्या ५१जणांमध्ये खडसेंसह महाराष्ट्रातील सर्वाधिक १२ लोकप्रतिनिधींचा समावेशआहे. त्यामध्ये प्रकाश मेहता, राज पुरोहित, सरदार तारासिंह, प्रा. देवयानी फरांदे (सर्व भाजप), खासदार राजकुमार धूत,संजय पोतनीस, सुनील राऊत, गौतम चाबुकस्वार, हर्षवर्धन जाधव (सर्व शिवसेना) आदींचा समावेश आहे. बहुतेक ‘आरोपी’लोकप्रतिनिधींवर कलम ३५४ व कलम ५०९चे (शाब्दिक व हावभावांद्वारे विनयभंगाचा प्रयत्न) गुन्हे आहेत. मात्र, बहुतेक गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र सादर झालेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिडकोने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा! – एकनाथ शिंदे

Aprna

ठाण्यात कारमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या

News Desk

यंदाच्या २४ महिला आमदार विधानसभेत

News Desk