पुणे। रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आज ( २५जून) ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुबोध मोहिते हे पहिल्यांदाच शिवसेनेकडून रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून निवडून आले होते, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही कारणांवरून वाद झाल्याने शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
काँग्रेस पक्षात असताना देखील लोकसभा निवडणुकीत त्यांना यश आले नाही. पुन्हा विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना हार पत्करावी लागली, पुन्हा बराच कालावधी ते राजकारणापासून दूर होते, आणि या सगळ्या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात हा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करण्यात आलाय.
सुबोध मोहिते काय म्हणाले?
विदर्भात आता मी माझं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दाखवेल आणि या बरोबरच उरलेलं आयुष्य साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घालवणार आहे. पुढे बोलताना सुबोध मोहिते अस देखील म्हणालेत या देशात जेवढे नेते आहेत त्यात विजनरी लिडर म्हणून पवार आहेत, म्हणूनच मी पवारांचा फॅन आहे. इतकंच नाही तर साहेबांच्या नेतृत्वाने मी प्रभावित झालो आहे.
माझ्या पक्षप्रवेशाला उशीर झालाय मात्र पण देर आये दुरूस्त आये अस देखिल सुबोध मोहिते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवेशाप्रसंगी म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतानाच सुबोध मोहिते यांनी पक्षाची बाजू घेतल्याचे दाखवले अनिल देशमुख यांच्यावर कारवाई ही राजकीय द्वेषापोटी होते अस देखील ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता सुबोध मोहिते किती दिवस राहतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोण आहेत सुबोध मोहिते?
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सुबोध मोहिते हे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते . राजकारणात येण्यापूर्वी युतीच्या कार्यकाळात ते भाजपचे मंत्री महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते . शिवसेनेने १९९८ मध्ये त्यांना रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली . यात ते काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव करून विजयी झाले .१९९९ मध्ये पुन्हा त्यांनी श्रीकांत जिचकार यांचा पराभव केला . याच काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री झाले .
नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत सुबोध मोहिते यांनी राजीनामा दिला . खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला . मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद व काँग्रेसचे प्रवक्तापदही दिले . विधान परिषदेची उमेदवारीही त्यांना जाहीर झाली होती . परंतु , त्यांचे हेलिकॉप्टर हवेतच फिरत राहिल्याने ते मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहचू शकले नाहीत . त्यांच्याऐवजी जळगावच्या श्रीमती जैन यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली व त्या आमदार झाल्या . तेव्हापासून त्यांचे राजकीय हेलिकॉप्टर हवेतच घिरट्या घालत आहे . ते अद्यापही कुठेही स्थिर झाले नाही . काँग्रेसने त्यांना रामटेक विधानसभेच्या दोनवेळा उमेदवारी दिली . या दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला .
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.