HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी – माजी आमदार, पराभूत उमेदवारांची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत संपन्न!

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यसरकारमध्ये असलेल्या पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, सर्व फ्रंटल सेलचे प्रदेशाध्यक्ष तसेच २०१९ च्या विधानसभेमध्ये निवडणुकीत अल्पशा मताने पराभूत झालेल्या सदस्यांची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बैठक घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांना बैठकीनंतर दिली.

या बैठकीत सर्व सदस्यांनी आपल्या स्थानिक भागातील प्रश्न पक्षासमोर मांडले. तसेच पक्षाच्या ध्येयधोरणांवर अनेकांनी आपली मते मांडली. यावर राज्यसरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना दिले असे नवाब मलिक यांनी सांगितले.

या बैठकीत चर्चा सुरु असताना राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याची सुचना पवारसाहेबांनी केली आहे. त्यानुसार तात्काळ पालकमंत्री, संपर्कमंत्री, आमदार यांनी नुकसानीचा पाहणी दौरा करुन उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्यसरकारच्या माध्यमातून सोडविण्यात येणारे प्रश्न निश्चित सोडवले जातील मात्र इंधन दरवाढ, गॅसदरवाढ असे प्रश्न केंद्रसरकारच्या अखत्यारीतील आहेत त्यावर कोविड नियमावली पाळून पक्षाने आपली भूमिका जनतेपुढे मांडण्यावर निर्णय घेण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाने ओबीसी रिक्त जागांवर ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

२०१९ मध्ये ज्या ११४ लोकांना उमेदवारी देण्यात आली होती त्या सर्व उमेदवारांनी आदरणीय खासदार शरद पवारसाहेबांसमोर आपले म्हणणे मांडले. साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत ५५ लोकांनी आपली मते मांडली. त्यांनी राजकीय प्रश्न शिवाय जनतेचे प्रश्न त्यांना कोणत्या प्रकारे मदत देता येईल याबाबतही माहिती दिली. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील हेमंत नाना देशमुख यांचा पक्षप्रवेश पार पडला.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोकर आर्य वैश्य युथ अध्यक्षपदी महेश नारलावार

News Desk

जळगावात शिवसेनेचा डंका, महापौर निवडणुकीत बाजी मारत भाजपला धक्का

News Desk

“राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद!”, देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर आक्रमक

News Desk