– ६०० लेकींच्या उपस्थितीत कनका कन्या मेळावा उत्साहात
हिंगोली: येथील कणका गावात यावर्षीपासून गावकऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण गावकऱ्यांनी कणका कन्या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील सर्व जात, धर्म, पंथ विसरून गावकऱ्यांनी एकत्र येऊन अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली. यानिमित्ताने सामाजिक सलोख्याचे अनोखे उदाहरण कणका या गावाने सर्वांसमोर उभे केले आहे, असे मत मिरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सोमवारी (ता. २७) बोलतांना व्यक्त केले.
ते म्हणाले, कन्या मेळाव्याचा मुख्य हेतू म्हणजे गावातील लेकिंच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना एकत्र आणणे. आज दरवर्षी छोटे होत जाणारे कुटुंब, आर्थिक गोष्टींमुळे दुरावलेले नातेसंबंध, मोबाईलमुळे वाढलेला दुरावा आणि हक्काची जागा नसणे यामुळे समाज विखुरला गेलाय. यांसारखे असंख्य सामाजिक प्रश्न गावासमोर उभे आहेत. त्यांना एकत्र आणण्याचा दृष्टीने हे पहिले पाऊल ठरेल. एकदा गावातील मुलगी लग्न करून गेली की ती सासरची होऊन जाते. लग्नाच्या काही वर्षानंतर हळूहळू कामातील व्याप आणि बऱ्याच गोष्टींनी माहेरपण तुटायला लागते. कधी कधी मुलींचे कुटुंब हरवलेले असते. या सर्व मुलींना माहेरपण आणि आपलेपणाचा ओलावा गरजेचं असतो. तो ओलावा, मायेची ऊब आणि हक्काचं माहेरपण या मुलींना कणका कन्या मेळाव्यातून मिळणार आहे. त्याचप्रमाणे या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा असल्याचे जिवंत उदाहरण मांडले आहे. हा सलोखा असाच कायम ठेऊन महिला सक्षमकरणासाठी प्रयत्न करूया.
अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले की, आम्ही गावातील सर्व विधायक कार्यासाठी गावच्या सोबत आहोत.
कणका कन्या मेळाव्यात जात, धर्म, पंथ विसरून गावातील ६०० हून अधिक लेकिंनी सहभाग घेतला होता. या लेकींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “या उपक्रमामुळे आम्ही कणक्याच्या लेकी कित्येक वर्षांनंतर एकत्र आलो. आम्हाला पुन्हा एकदा शाळा आणि गावातील आठवणींना उजाळा मिळाला. गावात खेळलेले लगोरी, लपंडाव, खोखो, उन्हाळ्यात खाल्लेली कुल्फी सगळं काही डोळ्यासमोर उभ राहील. या उपक्रमातून आमच्याच कुटुंबातील गढूळ झालेले नाते पुन्हा एकदा स्वच्छ झाले. संवादातून कितीही मोठी समस्या असली तरीही ती सुटू शकते याची जाणीव झाली. या उपक्रमामुळे मिळालेली ऊर्जा वर्षभर नक्कीच पुरेल. हा उपक्रम दरवर्षी व्हावा.”
या मेळाव्याला संभाजीनगर, हिंगोली, पुणे, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर आदी गावातून कनक्याच्या लेकिंनी हजेरी लावली होती. यावेळी माजी संचालक रवींद्र सावंत, ऊर्जा विभागातील उपसचिव नारायण कराड, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, आयुक्त संजय काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री काटकर – बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन गोरखनाथ पानपट्टे यांनी केले. आभार अशोक काटकर यांनी मानले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.