नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्ण वाढत आहेत. अशात महराष्ट्रातील एका जिल्ह्याने कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणून दाखवली त्याचं कौतुक आणि त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. आज (२० मे) जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन झालेल्या बैठकीत ही दखल घेतली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावात आरोग्य व स्वयंसेवकांच्या चार टीम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. कोरोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या टीमने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले, त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दुध-दुभत्याच्या कामाचे काय होणार? ही काळजी मिटली.
ज्यांचा सुरुवातीला विलगीकरणात जाऊन उपचाराला विरोध होता ते या प्रयत्नामुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले. यातूनच करोनामुक्त हिवरेबाजारची वाटचाल सोपी होऊन गाव काही कालावधीतच करोनामुक्त झाले. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली व हिवरेबाजारचा हा करोनामुक्तीचा पॅटर्न पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील करोना रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी समजून घेतली.
तसेच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांची प्रयत्नांची आणि अनुभवाची ही शिदोरी पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या जाव्यात, जिल्ह्याच्या ज्या गावात करोनाचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो होणार नाही आणि जिथे झाला आहे तिथे कडक उपाययोजनांद्वारे तो नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे करोनामुक्त होतील यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही मोदी यांनी यावेळी केल्या.
तसेच, पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्या लाटेत युवक आणि बालकांना करोना लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन बालरोग तज्ज्ञांची टीम तयार करण्यात यावी, बालकांच्या मापाचे छोटे ऑक्सीजन मास्क तयार ठेवावेत, करोनामुक्तीसाठी जनजागृती वाढून करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, लसीचा एकही डोस वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी अशा काही सुचनाही यावेळी केल्या.
केंद्रीय आरोग्य सचिवांकडून मुंबईचे कौतूक
बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशभरातील कोविडची स्थिती, उपाययोजना याचे सविस्तर सादरीकरण केले. यात त्यांनी उत्तम ऑक्सीजन व्यवस्थापन आणि करोना नियंत्रणासाठी मुंबईत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला ते म्हणाले की ऑक्सीजनचा बफर स्टॉक करतांना अधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक यांची माहिती जाहीर करून ऑक्सीजनची उपलब्धता आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन मुंबईत करण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.