HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : मानसिक छळाबाबत डॉ. पायल यांच्या मित्राचा खुलासा

वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी आपल्या वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणी पायल तडवी यांचे मित्र रोमिल काकड यांच्याशी एच.डब्ल्यू.ने संवाद साधला. पायलवर होणाऱ्या छळाबाबत पायलने मला सांगितले होते, अशी माहिती यावेळी रोमिल काकड यांनी एच.डब्ल्यू.ला दिली आहे.

डॉ. पायल यांचा मित्र रोमिल काकड यांचा खुलासा

जवळजवळ ६ महिन्यांपूर्वी पायल यांनी आपला मित्र रोमिल यांना व्हॉटसअपवर मेसेज करून रुग्णालयात तिच्या वरिष्ठांकडून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आपल्याला सांगितल्याचे रोमिल काकड यांनी सांगितले. “पायलने मला सांगितले की तिचे वरिष्ठ तिचा प्रचंड छळ करीत आहेत. ती यापुढे हे सहन करू शकत नाही. तिला कॉलेज सोडायचे होते”, असे रोमिल काकड यांनी एच.डब्ल्यू.शी बोलताना सांगितले.

“पायलचे वरिष्ठ तिला कोणत्याही ऑपरेशनमध्ये सहभागी होऊ देत नव्हते. तिला ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करू देत नव्हते”, असे रोमिल काकड यांनी सांगितले आहे. “तिचे वरिष्ठ तिला प्रसूतीच्या केसेस देखील हॅन्डल करू देत नव्हते. त्याचप्रमाणे ते तिला रुग्णालयातील सर्व रुग्णांसमोर अपमानित करत होते”, असेही रोमिल काकड यांनी सांगितले. डॉ. पायल तडवी यांनी याबाबत आपल्या आईकडे देखील तक्रार केली होती.

नोव्हेंबर २०१८ मध्ये नेमके काय झाले ?

नोव्हेंबर २०१८ मध्ये साधारणतः १ महिना पायल कामावर जात नव्हती. यादरम्यान, तिने आपला मित्र रोमिल यांना मेसेज करून आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल, आपल्याला होणाऱ्या यातनांबद्दल सांगितले होते. रोमिल काकड यांनी विशेषतः एच.डब्ल्यू.न्यूजसोबत त्यांच्या आणि डॉ. पायल यांच्यात झालेल्या संभाषणाचे (व्हॉट्सअप चॅट्सचे) काही स्किनशॉट्स शेअर केले आहेत.

डॉ. पायल तडवी यांनी ६ महिन्यांपूर्वी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल काही गोष्टी रोमिल यांच्यासोबत व्हॉट्सअपवर शेअर केल्या होत्या. यावेळी बोलता बोलता डॉ. पायल यांनी मस्करीत आत्महत्येचा उल्लेखही केला होता. “सर्वांना वाटते कि माझ्यावर होणाऱ्या या अत्याचारांमुळे मी आत्महत्या वैगरे करणार कि काय ?”, असे डॉ. पायल यांनी तेव्हा गंमतीने म्हटले होते.

डॉ.पायल तडवी आणि मित्र रोमिल काकड यांच्यात झालेले हे संपूर्ण संभाषण मराठीत आहे. तसेच, ते एका विशिष्ट क्रमाने नाही.

डॉ. पायल यांचे वरिष्ठ भर रुग्णालयात त्यांच्यावर इतक्या मोठ्या आवाजात ओरडायचे कि त्यांचा आवाज रुग्णालयाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत ऐकू जाईल. हा प्रकार दररोज व्हायचा, असे रोमिल यांनी सांगितले. डॉ.पायल यांचे वरिष्ठ त्यांना प्रसूती किंवा एपिसीओटॉमी (बाळंतपणादरम्यान योनिच्या उघड्या शस्त्रक्रियेतील कट ऑफ) विभागात देखील काम करू देत नव्हते. दर दिवशी होणाऱ्या या प्रचंड त्रासामुळे आपले युनिट बदलले जाईपर्यंत आपण कामावर रुजू होणार नाही अशी अट घालत डॉ. पायल यांनी कामावर जाणे बंद केले होते.

“अद्यापही परिस्थिती खराब आहे का ?”, असा प्रश्न जेव्हा रोमिल यांनी काही दिवसांनंतर डॉ. पायल यांना विचारला तेव्हा तेव्हा डॉ. पायल म्हणाल्या कि, “आता या गोष्टीला जवळपास ७ महिने उलटून गेले आहेत. आमचे संबंध आतापर्यंत मैत्रीपूर्ण व्हायला हवे होते. आमचे संबंधी मैत्रीपूर्ण होतील असे मला अपेक्षित होते. परंतु, तसे काहीच झाले नाही. उलट परिस्थिती आणखीच वाईट झाली आहे”

पायल एक अत्यंत आनंदी व्यक्ती होती !

नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यापूर्वी पायल यांनी मिरज येथील जीएमसी महाविद्यालयात एमबीबीएसचा अभ्यास केला होता. “पायल एक अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. ती अत्यंत कष्टाळू होती. तिच्या कुटुंबातील डॉक्टर होणारी ती एकमेव व्यक्ती होती. ती अभ्यासात अत्यंत हुशार होती. पायल ही एक हसतमुख, आनंदी व्यक्ती होती,” असे रोमिल म्हणाले. “आम्ही कधीही असा विचार केला नव्हता कि तिला होणारा हा त्रास तिला या निर्णयानंतर घेऊन येईल”, असे रोमिल म्हणाले.

तिला जातिमुळे त्रास दिला होता का ?

“मला त्याबद्दल माहित नाही. मला या विषयाबद्दल जे काही माहिती होते ते सर्व मी आपल्याबरोबर शेअर केले आहे “, असे रोमिल म्हणाले.

मी स्वतः डॉ. पायल यांचा छळ होताना पहिले आहे

अंजली खंडारे नावाच्या एका व्यक्तीने आपल्या ट्विटरवर असे लिहिले होते कि, “मला ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी डॉ. हेमा यांच्याकडून रुग्णांद्वारे भरलेल्या संपूर्ण वार्डसमोर डॉ. पायल यांचा छळ होताना पहिले आहे. मी तिला रडताना पाहिले आहे. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. डॉ. पायल यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनाही अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहेर हिला मंगळवारी (२८मे) संध्याकाळी पहिली अटक झाली. दरम्यान, या तिन्ही आरोपींना आज (२९ मे) मुंबई सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आले. दरम्यान, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरएम सद्रानी यांनी या तिन्ही आरोपींना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींना भारतीय दंड संहितेच्या अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, रॅगिंग विरोधी कायदा, आयटी कायदा आणि कलम ३०६ (आत्महत्याची उकल) अंतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पडळकर हा एक मनोरुग्ण,” शिवसेनेचा पडळकरांवर थेट वार  

News Desk

‘शहा-मोदींकडे आमचं कामच नव्हतं’, चंद्रकांत पाटलांचं पत्रकार परिषदेत विधान!

News Desk

मातोश्री पाणंद रस्ते व रोहयोची कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत! – संदिपान भुमरे

Aprna