HW News Marathi
महाराष्ट्र

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच!– नरेंद मोदी

मुंबई । लता दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जेव्हा लता दीदी सारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने मिळत असेल तर हा पुरस्कार माझ्यासाठी आपलेपण आणि स्नेहाचे प्रतीक आहे. लता दीदीच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मी लता दीदी आपल्या सर्व देशबांधवांची असल्याने त्यांना समर्पित करतो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

भारतासह जगभरात आपल्या गायनामुळे नावलौकिक मिळविलेल्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला लता मंगेशकर पुरस्कार मला मिळणे हे माझे भाग्यच समजतो, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकाल्यानंतर आपली भावना व्यक्त केल्या.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सन्मानपूर्वक एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, लता दीदी आणि माझी ओळख दिवंगत सुधीर फडके यांनी करून दिली. गेल्या अनेक वर्षात मला लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबीय यांच्याकडून खूप स्नेह मिळाला आहे. गेले अनेक वर्षे मंगेशकर कुटुंबीय माझ्या जीवनाचा हिस्सा बनले असून यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मला त्यांची विशेष आठवण येईल. संगीताच्या या सामर्थ्याला, या शक्तीला आपण लतादीदींच्या रुपात प्रत्यक्षात पाहू शकलो, याचा माझ्यासह समस्त देशवासीयांना अभिमान वाटतो. आपण कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही असे ठरविले होते पण हा पुरस्कार माझ्या बहिणीच्या नावाने असल्याने हा पुरस्कार मी स्वीकारला असून हा पुरस्कार मी समस्त देशवासीयांना अर्पण करतो.

गेल्या जवळपास 80 वर्षांपासून आपण लता दीदी यांचे गीत ऐकत आहोत. लताजी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या मधूर सादरीकरणाप्रमाणे होत्या, देशातील 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. हिंदी, मराठी किंवा संस्कृत असो किंवा इतर भारतीय भाषा असोत, लताजींचा स्वर प्रत्येक भाषेत मिसळलेला आहे. संस्कृती पासून ते श्रद्धेपर्यंत, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लता दिदींच्या सूरांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधण्याचे काम केले. जगभरात देखील, त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या असेही मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

जे अव्यक्ताला व्यक्त करतात- ते शब्द असतात! जे व्यक्तामध्ये ऊर्जेचा, चेतनेचा संचार करतो- तो नाद असतो. आणि जे चैतन्याला भाव आणि भावनांनी भरून टाकतं, त्याला सृष्टी आणि संवेदनेच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचवतं ते संगीत असतं. संगीतातून आपल्याला मातृत्व आणि ममतेची अनुभूती मिळते. खरे तर संगीत आपल्याला देशभक्ती आणि कर्तव्याच्या जाणीवेच्या शिखरावर नेऊ शकते. लता दीदींच्या गाण्यातून आणि संगीतातून आपल्या सगळ्यांना हीच अनुभूती गेल्या 80 वर्षांपासून मिळत आहे, हेच आपले भाग्य असल्याचे मोदी म्हणाले.

लता मंगेशकर हे गायन क्षेत्रातील सरस्वतीचे प्रतीक

आजपर्यंत अनेक भाषांमध्ये गायन केलेल्या लतादीदी या केवळ मंगेशकर कुटुंबियांच्या नाहीत तर आपल्या सर्वांच्या दीदी होत्या. आपल्या गाण्यात निर्मळता, तरल भाव आणि समरसता दाखवून सतत नवीन काही शिकण्याची आस असलेल्या दीदींचे काम नवीन पिढीसाठी प्रेरणादायक असून दीदी म्हणजे गायन क्षेत्रातील सरस्वतीचे प्रतिक आहे असे मी मानतो असे सांगून कोविड काळात मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेल्या रुग्णसेवेचा प्रधानमंत्र्यांनी गौरव केला.

मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान, मंगेशकर कुटुंबीय, हृदयेश आर्ट्सच्या वतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 80 वा स्मृती सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रदान केला गेला. पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासह संगीत, नाटक, कला आदी क्षेत्रातील पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रातील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना, चित्रपट सेवेसाठीचे विशेष मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांना, मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी हा सेवा पुरस्कार मुंबईचे डबेवाले यांना आणि सर्वोत्कृष्ट नाटकासाठी पुरस्कार ‘संज्या छाया’ नाटकास यावेळी देण्यात आला.

यंदाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उषाताई मंगेशकर यांच्याकडे होते. भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाच्या वर्षापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 80 वी पुण्यतिथी असून त्या दिवशीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मंगेशकर परिवार आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने आजचा कार्यक्रम आयोजित केला होता.

आजच्या कार्यक्रमाला पंडित हृदयनाथ मंगेशकर तब्येत बरी नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ मंगेशकर आणि हरीश भिमानी यांनी केले. आशा भोसले यांनी या कार्यक्रमादरम्यान लता दीदी यांच्या काही आठवणी सांगितल्या. तर उषा मंगेशकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमाच्या वेळी गायक रुपकुमार राठोड यांनी ‘स्वरलतांजली’हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात रूपकुमार राठोड यांच्यासह गायक हरिहरन, विभावरी आपटे, मधुरा दातार, प्रियांका बर्वे, रीवा राठोड, आर्या आंबेकर यांनी काही गाणी यावेळी सादर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी केली पडळकरांची तक्रार थेट मोदी आणि नड्डांकडे

News Desk

“….म्हणूनच केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेसाठी” मुख्यमंत्र्यांनी दीपक पांडेंची केली होती निवड!

News Desk

आता सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक !

News Desk