HW News Marathi
महाराष्ट्र

फुटबॉल पायाने खेळायचा जरी खेळ असला तरी त्याच्यामध्ये डोके वापरावे लागते! – मुख्यमंत्री

अलिबाग | मला आजही फुटबॉलमधले काहीच कळत नाही. फुटबॉल हा पायाने खेळायचा जरी खेळ असला तरी त्याच्यामध्ये डोके वापरावे लागते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावाला आहे. नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (१६ जानेवारी) झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मला आजही फुटबॉलमधले काहीच कळत नाही. फुटबॉल हा पायाने खेळायचा जरी खेळ असला तरी त्याच्यामध्ये डोके वापरावे लागते. इतक्या वेगाने हा खेळ खेळावा लागतो आणि त्यासाठी वेगानेच विचार करावा लागतो. माझी इच्छा अशी आहे की, फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघाचाही दरारा निर्माण झाला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व महिला आशिया चषक भारत 2022 चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आदेश बांदेकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, सहव्यवस्थापक कैलास शिंदे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

मातीशी नाळ जोडली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.

स्पोर्ट सिटीचा उदय

खारघर हे शहर भविष्यात “स्पोर्टस् सिटी” म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेवटी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा भारताचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर भारताच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र शासनाचे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार मानले. नव्या पिढीचा आवडता खेळ फुटबॉलच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. या उत्कृष्टता केंद्राच्या व मैदानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू घडतील, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढेल यासाठी सर्वजण मिळून सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच याच मैदानात लवकरच एएफसी वूमेन एशियन कप इंडिया 2022 चे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे श्री.एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील हे उत्कृष्टता केंद्र एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे सांगून नवी मुंबई शहर हे एज्युकेशन सिटी, आयटी सिटी याबरोबरच आता “स्पोर्टस् सिटी” म्हणूनही ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

नव्या पिढीसाठी पर्वणी

पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटबॉलप्रेमी नव्या पिढीसाठी हे केंद्र एक पर्वणी ठरणार असून येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. खारघर, नवी मुंबई, पनवेल हे विविध खेळ व त्या खेळांसाठीच्या सोयीसुविधांचे केंद्रबिंदू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू, संघ आपल्या महाराष्ट्राचे व भारताचे नाव मोठे करतील, असे सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील मानाचा केंद्रबिंदू

राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे म्हणाल्या, नव्या पिढीचा फुटबॉल हा आवडता खेळ आहे. येत्या काळात पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या पार्श्वभूमीवर या उत्कृष्टता केंद्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित होतील. ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावंत खेळाडूंसाठी हा प्रकल्प निश्चितच लाभदायक राहील. यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू घडविले जातील, त्यामुळे हा प्रकल्प क्रीडा क्षेत्रातील एक मानाचा केंद्रबिंदू ठरेल.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाविषयीची तांत्रिक व प्रशासकीय माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. तसेच या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेष आभारही मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे या प्रकल्पाचे आभासी उद्घाटन झाले. त्यानंतर या प्रकल्पाच्या निर्मितीबाबतची छोटीशी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिडकोचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वर्षा’वर आज तासभर खलबतं ! उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

News Desk

मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो !

News Desk

“उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल”

News Desk