HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदूंच्या राज्यात गणरायावरही अत्याचार?

मुंबई |महाराष्ट्रात फडणवीसांचे आणि केंद्रात मोदींचे राज्य येताच हिंदुत्ववाद्यांना त्यातल्या त्यात बरे दिवस येतील असे वाटले होते, पण रोजच भरवशाच्या म्हशीला टोणगा होत आहे. आजही बंधने फक्त हिंदूंच्या सण-उत्सवांवरच येत आहेत. ही मुस्कटदाबी हिंदूंच्या बाबतीत काँग्रेस राजवटीत व्हायची असे आरोप तेव्हा झाले. पण आता भाजप राज्यात ती जरा जास्तच होताना दिसत आहे. आजही बंधनं फक्त हिंदूंच्या सण-उत्सवांवरच येत आहेत, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकीय मधून सरकारवर निशाणा साधला आहे . हिंदूंच्या राज्यात गणरायांना मुकाटपणे अत्याचार सहन करत आहेत, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे भाजपा सरकारवर बरसले आहेत.

सामनाचे आजचे संपादकीय

महाराष्ट्रात फडणवीसांचे आणि केंद्रात मोदींचे राज्य येताच हिंदुत्ववाद्यांना त्यातल्या त्यात बरे दिवस येतील असे वाटले होते, पण रोजच भरवशाच्या म्हशीला टोणगा होत आहे. आजही बंधने फक्त हिंदूंच्या सण-उत्सवांवरच येत आहेत. ही मुस्कटदाबी हिंदूंच्या बाबतीत काँग्रेस राजवटीत व्हायची असे आरोप तेव्हा झाले. पण आता भाजप राज्यात ती जरा जास्तच होताना दिसत आहे. सांगली, जळगाव महापालिका विजयाची धुंदी उतरली असेल तर गणपती उत्सवाच्या बाबतीत सुरू असलेल्या मोगलाईची दखल राज्याच्या लाडक्या, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. महापालिकेच्या एका टिनपाट वॉर्ड ऑफिसरने गिरगावातील गणेशोत्सवाचा मंडप उखडताच त्याच्या कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी दणका दिला आहे. थोडी ठोकाठोक झाली, पण श्री गणरायाचे आगमन सुकर व्हावे व हिंदुत्वाचा मान राहावा म्हणून शिवसैनिकांनी याप्रकरणी नवे खटले अंगावर घेतले आहेत. गणेशोत्सवात, विशेषतः खास हिंदूंच्याच सण-उत्सवात न्यायालय, प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे असे अडथळे येत असतील तर या देशाचे भविष्य काय? प. बंगालात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजा आणि दुर्गा मिरवणुकीत कायदेशीर अडथळे आणले म्हणून ज्यांनी शिमगा केला त्यांचे राज्य आज महाराष्ट्रात आहे. ममता बॅनर्जींना तेव्हा देशद्रोही, हिंदुद्रोही ठरवून

राजकीय तांडव करणाऱ्यांनी

राज्यातील गणेशोत्सवात अडथळे आणणाऱ्या नोकरशाहीचे कान उपटू नयेत याचे आश्चर्य वाटते. गणेशोत्सव, नवरात्रीसारखे सण आले की नवी फर्माने सुटत असतात. देवादिकांच्या मूर्तींना फुटपट्ट्या लावल्या जातात. उत्सवांचे मंडप घालायचे की नाहीत, घातले तर किती आकाराचे घालायचे वगैरे कायदेकानू बनवले जातात व गणरायांच्या आगमनाच्या आनंदावर विरजण टाकले जाते. हे सर्व प्रकरण कुणीतरी न्यायालयाच्या दारात घेऊन जाते व न्यायालयेदेखील आपणच राज्यकर्ते असल्याच्या थाटात सण-उत्सवांच्या विरोधात फर्माने जारी करतात. जणू न्यायालयांच्या टेबलावरील सर्व प्रकरणे संपली आहेत व हिंदूंचे, सण-उत्सव साजरे करणाऱ्या आयोजकांचे कान उपटणे व त्यांना फर्माने सोडणे इतकेच काम उरले आहे. जे न्यायालय हिंदूंच्या राममंदिराबाबत गेल्या पंचवीस वर्षांत निर्णय देऊ शकले नाही, जे न्यायालय महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाबाबत निर्णय देऊन कानडी जोखडाखालील मराठी बांधवांना न्याय देऊ शकत नाही ते न्यायालय हिंदू सण-उत्सवाबाबत मार्गदर्शक नियमावली तयार करते व त्या नियमावलीची भेंडोळी नाचवत नोकरशाही गणेशोत्सवाला आडवी जाते. हा एक प्रकारे ‘अॅट्रॉसिटी’चाच प्रकार आहे, पण हिंदूंच्या सण- उत्सवांवरील अत्याचार तुमच्या त्या अॅट्रॉसिटी कायद्यात मोडत नाहीत. त्यामुळे

देवाधिराज गणरायही

मुकाटपणे हे अत्याचार सहन करतात. अर्थात हिंदूंची, देवाधर्माची रक्षणकर्ती शिवसेना हे सर्व घडू देणार नाही. दुर्गापूजा रोखू पाहणाऱ्या ममता बॅनर्जी या भाजपच्या दृष्टीने हिंदुद्रोही ठरल्या. मग गणेशोत्सव रोखू पाहणाऱ्यांना आता कोणती उपाधी द्यावी? तिकडे उत्तर प्रदेशातील मुगलसराय नामक रेल्वे स्थानकाचे नामांतर पंडित दीनदयाल उपाध्याय नावाने केले म्हणून भाजपवाले हिंदुत्ववादी असल्याचे ढोल पिटत आहेत, पण ज्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा जागर व्हावा म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव साजरे केले तो गणेशोत्सवच अडचणीत आला तरी हे गप्प बसले आहेत. पंतप्रधान मोदी हे म्हणे मुसलमानी टोपी ‘पेहनत’ नाहीत म्हणून ते हिंदुत्ववादी असा प्रचार सुरू आहे. पण मुसलमानी टोप्या घालणाऱ्या काँग्रेजी राजवटीतदेखील हिंदूंच्या सण-उत्सवांचे असे धिंडवडे कधी निघाले नव्हते, असे आता दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हे सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा कारभार गतिशील आहे, ते कार्यक्षम आहेत अशा जाहिराती करणाऱ्यांनी गणेशोत्सवात दंडेली करणाऱ्यांना रोखण्याची गतिशीलता दाखवावी. नाहीतर देश, देव आणि धर्मासाठी शिवसैनिकांना भगव्याचे तेज दाखवावे लागेल. कायद्याची भीती आम्हाला दाखवू नका.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत होणार बैठक, हार्दीक पटेल राहणार उपस्थित

News Desk

“काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल”, नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

Aprna

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी रुपाली चाकणकर यांची निवड

News Desk