HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

अखेर इंदोरीकर महाराजांचे शिवाजी विद्यापीठातील कीर्तन रद्द

कोल्हापूर | कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा आज (२८ फेब्रुवारी) कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता तो रद्द करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज कार्यक्रमाला वेळेत येऊ न शकल्याने कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती कीर्तनाच्या आयोजकांनी दिली. काही पुरोगामी संघटनांनी या कार्यक्रमास विरोध केला होता. स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा कार्यक्रम शिवाजी महाहारांसारख्या थोर विचारवंतांच्या विद्यापीठात नको अशी भूमिका अंनिस आणि पुरोगामी संघटनांनी घेतली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच वादग्रस्त विधानांवरुन इंदोरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात आहे. आज कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठात इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला पुरोगामी संघटनांनी कडाडून विरोध केला होता तर काही सामाजिक महिला कार्यकर्त्या आणि कीर्तनकारांचे आयोजक यांच्यात बाचाबाची देखील झाली होती. पण हा कार्यक्रम घेणारच अशी भूमिका कोल्हापूर युवा सेनेने घेतली होती. याच मुद्द्यावरुन पुरोगामी संघटना आणि कोल्हापूर युवा सेना यांच्यात वादावादी झाली होती.

शिवाजी विद्यापीठात आज सायंकाळी ४ वाजता इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम होता. मात्र त्याआधी अंनिसचे कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जाऊन जाब विचारला. त्यामुळे कोल्हापुरात इंदोरीकर महाराज यांच्या एण्ट्रीआधी चांगलंच वातावरण तापले होते. इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनादरम्यान सम-विषम तारखांवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी त्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”, या शब्दांत इंदोरीकर महाराजांनी दिलगीरी व्यक्त केली होती.

Related posts

नरसिंहा राव यांच्यानंतर मनमोहन सिंह हे देशाला लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान !

News Desk

कोरोनाशी दोन करण्यासाठी खेळाडूंची मदत

rasika shinde

विधानसभा निकालानंतर बंडखोर, अपक्ष उमेदवारांना मोठे महत्त्व प्राप्त

News Desk