HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची ‘अशी’ आहे कारकीर्द !

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर सरकारने उचलबांगडी केली आहे. आता त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे यांचं इयत्ता सहावीपर्यंतचं शिक्षण चंद्रपूरच्या भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी नागपूरला आले. नागपूरच्या पटवर्धन शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आताच्या व्हीएनआयटीमधून बीई मेकॅनिकलची पदवी घेतली. तर मुंबतून फायनान्स मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे.

हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा १९ महिन्यांचा कालावधी सध्या शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली होती. नगराळे सध्या पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

हेमत नगराळेंनी IPS अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही सेवा बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. १९९२ ते १९९४ या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते. सोलापूर जिल्ह्यात नवे आयुक्तालय सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. १९९२ च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली होती. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली होती.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना १९९४ ते १९९६ या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं होतं. १९९६ ते १९९८ मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती.

लहान मुलांचे अपहरण व हत्या करणाऱ्या कुप्रसिद्ध अंजनाबाई गावित हिच्या विरोधातील प्रकरणाची चौकशीही नगराळे यांनी केली. सर्वोच्च न्यायालयानं कालांतरानं गावित हिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. सीबीआयच्या सेवेत असताना बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहताचा घोटाळा अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली नगराळेंनी. तेलगी मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीत त्यांनी बारकाईनं केलेल्या तपासाचं कौतुक झालं होतं.

हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रत्येकी ७५ कोटींचे प्रस्ताव तातडीने द्यावेत – अजित पवार

News Desk

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पाकधार्जिणे ! | नाना पटोले

News Desk

अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

News Desk