HW News Marathi
महाराष्ट्र

वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प! – मुख्यमंत्री

पुणे | पुणे (Pune )शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर असणार आहे. त्यादृष्टीने फेम २ अंतर्गत ई-बसची सुविधा महत्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाला फेम २ अंतर्गत प्राप्त ९० ई-बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ई-बसच्या वापरामुळे प्रवाशांना आरामदायी वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बसेसचे नागरिकांकडून स्वागत होईल. पुणे उद्योग आणि विद्येचे माहेरघर आहे. सांस्कृतिक शहर आणि एक महानगर म्हणून पुण्याचा विस्तार होत आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक वाहतूक मजबूत होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पीएमपीएमएलची बससेवा महत्वाची ठरणार आहे.

प्रदूषण विरहीत वाहतूकीसाठी ई-बससेवा महत्त्वाची

सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषण विरहीत होण्यासाठी ही बससेवा महत्वाची आहे. पीएमआरडीए क्षेत्रात सार्वजनिक वाहतूक उपयुक्त ठरली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड सोबत महानगरात समाविष्ट झालेली गावे आणि इतरही ग्रामीण भागातील गावांमध्ये पीएमपीएमएलची बससेवा पोहोचली आहे.

महानगरातील वाहतूक कोंडी ही येत्या काळातील मोठी समस्या होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुविधाजनक करणे हा त्यावरचा प्रभावी उपाय ठरू शकेल. त्यासाठी येत्या काळात ई-बससेवेचा विस्तार करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध प्रकल्पांना शासन गती देत असल्याचेही श्री.शिंदे म्हणाले.

हरित ऊर्जा उपयोगाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर-केंद्रीय मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे

ई-बस सेवा सुरू करण्यासाठी पीएमपीएमएलचे अभिनंदन करून डॉ.पांडे म्हणाले, फेम २ अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा उद्देश हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे. यामुळे विकसीत देश म्हणून ओळख होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण कमी करून नागरिकांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी ही सुविधा महत्वाची आहे. पुणे शहराने ई-मोबीलीटीच्या दिशेने सर्वात पहिले पाऊल उचलले ही गौरवास्पद बाब आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंचामृत’ संकल्पनेअंतर्गत देशात २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन करण्याच्या उपययोजनांवर भर दिला आहे. देशातील अर्थव्यवस्थेतही कार्बनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाला हरित ऊर्जेच्यादृष्टीने समर्थ करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल ठरेल. हे उद्दीष्ट गाठण्यात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान आहे.

ऑटो उद्योगातही यादृष्टीने सुधारणा करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. या क्षेत्रातील उद्योजकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक आहे. देशात कोरोना नंतरच्या काळात या क्षेत्रात ७५ हजार कोटींची नवी गुंतवणुक झाली आहे. इलेक्ट्रीक बॅटरीच्या क्षेत्रात चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे शहरासाठी येत्या काळात मेट्रोचा विस्तार करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी विविध प्रकारच्या ॲपचे आणि ई-प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रभावी वापर निश्चित करण्यात येईल. ई-बससेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणेल.

पीएमपीएमएल देशातील अग्रणी प्रकारची अपारंपरिक ऊर्जेवर चालणारी सेवा म्हणून नावारुपास येणार आहे. ही बससेवा पुणेकरांच्या पसंतीस पडली आहे. या बसेसनी २ कोटी किलोमीटर वाहतूकीचा टप्पा पूर्ण केला आहे. केंद्र सरकारने फेम २ अंतर्गत ई-बसेससाठी मोठी सबसिडी दिल्याने लोकांवर अतिरिक्त बोजा पडला नाही. येत्या काळात अपारंपरिक ऊर्जेवर चालणारी आणि शून्य कार्बन उत्सर्जन करणारी ही देशातील पहिली बससेवा ठरेल.

राज्यातील पूर्ण सार्वजनिक वाहतूक सुविधा पर्यायी इंधनाच्या सहाय्याने चालविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्यात येत आहेत. पीएमपीएमएलने सर्व चार्जिंग स्टेशन सौर ऊर्जेवर रुपांतरीत करावे आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्याच्या दिशेने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उद्घाटन आणि ई-बसेसचे लोकार्पण करण्यात आले. आमदार सुनिल कांबळे यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत करण्यात आलेल्या पुणे स्टेशन बस डेपो येथे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षालय इमारतीचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

प्रास्ताविकात मिश्रा यांनी पीएमपीएमएल सेवेची माहिती दिली. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात क्षेत्रात पीएमपीएलच्या माध्यमातून २००० बसेस चालविण्यात येतात. फेम २ अंतर्गत नव्या १५० ई-बसेस प्राप्त होणार असून त्यापैकी ९० बसेसचे लोकार्पण होत आहे. ही प्रदूषणमुक्त आणि आरामदायी सेवा आहे. देशात ई-बसेसचा सर्वाधिक उपयोग करणारी पीएमपीएल ही देशातील अग्रगण्य संस्था आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, संजय जगताप, महेश लांडगे, सुनिल कांबळे, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, अवजड उद्योग सहसचिव अमित मेहता, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीए आयुक्त्‍ राहुल महिवाल, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चेतना केरुरे आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ॲट्रॉसिटी ॲक्टला कमकुवत करणाऱ्या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार नाही! – सिद्धार्थ हत्तिअंबिरे

Aprna

CBI, ED काहीही असू द्या, काहीही झालं तरी सरकार, आमदार, नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत – संजय राऊत  

News Desk

महापुराच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk