Site icon HW News Marathi

ज्येष्ठांना सन्मान, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे राज्य! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर। महाराष्ट्र हे ज्येष्ठांना जपणारे, सन्मान देणारे राज्य आहे. महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे आहे. शासनाची भूमिका याच पदपथावर वाटचाल करणारी आहे. या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) राज्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व घटकांच्या विकासासाठीचे निर्णय घेतले. समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी साथ देऊन प्रगतीच्या महामार्गावर आपल्या राज्याला नेऊया, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शुक्रवारी (३१ डिसेंबर) विधानसभेत केले.

विधानसभेत शुक्रवारी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री शिंदे यांनी तपशीलवार उत्तर दिले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात गेल्या सहा महिन्यात राज्यातील विविध घटकांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. विदर्भ विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, युवक, महिला, शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली.

नागपुरात झालेल्या या अधिवेशनात विदर्भासह राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  विदर्भाच्या सर्वांगीण विकासाची भूमिका आम्ही मांडली. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत ही राज्य शासनाची भूमिका आहे. याच भूमिकेतून या भागातील प्रकल्पांना गती देण्याचे काम करीत आहोत.  राज्य शासनाच्या कामाचा वेग जनतेने पाहिला असल्याचे त्यांनी नमूद केले. कमी कालावधीत नागरिकांच्या हिताचे सर्वाधिक निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना चौकटीबाहेर जाऊन बाहेर मदत केली. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानग्रस्तांना 755 कोटी रुपयांची मदत केली. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत आपण केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार कोटींची मदत देण्यात आली. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार रुपये प्रती हेक्टरी बोनस जाहीर केला. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात 75 हजार जणांना नोकऱ्या देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. याशिवाय दोन हजार अधिसंख्य पदे भरण्यात येणार आहेत. कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून लाखो युवकांना संधी मिळणार आहे. गडचिरोली सारख्या ठिकाणी  सुरजागड प्रकल्पात खनिजाच्या उत्खननाबरोबरच खनिजावर प्रक्रिया करणारा प्रकल्प करीत आहोत, यामुळे गडचिरोलीची ओळख बदलणार आहे. हजारो  हातांना काम मिळणार आहे. राज्य शासनाने 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजूर केले, त्यातील 44 हजार कोटींचे प्रकल्प एकट्या विदर्भातीलच आहेत, त्यामध्ये 45 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आपण विविध निर्णय घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचे उघडकीचे प्रमाण वाढलेले आहे. पोलिसांनी स्थानिक गुन्ह्यांमध्ये पुढाकार घेऊन कारवाई केल्याने ही वाढ झाली आहे. राज्यात आता 18 हजार पोलीस भरती देखील सुरु केली आहे. दोषसिद्धीचे प्रमाण 60 टक्के इतके झाले आहे. गतवर्षीशी तुलना केली असता दोषसिद्धीचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले. ऑपरेशन मुस्कान मध्ये राज्यात 2015-22 कालावधीत मिसींग रेकॅार्डवरील 37 हजार 511 लहान मुले, मुली यांना पालकांच्या किंवा बाल कल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महापुरुषांच्या अवमानासंदर्भात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करता येईल का किंवा सध्याच्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती अथवा सुधारणा करता येतील का यासाठी विधिमंडळातील सन्माननीय सदस्यांची समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे

Exit mobile version