मुंबई | ‘महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात लवकरच भूकंप होईल. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल,’ दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पाटलांनी केलेल्या दावाव्य सामनाच्या आज (१६ मे) अग्रलेखातून खरपूस समाचार केला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटले, “चंद्रकांतदादा अशी काही उलथापालथ घडवू पाहत असतील तर तो त्यांचा राजकीय हक्क आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एखादा लंगोट कसून मैदानात उतरायचा प्रयत्न जरूर करून पहावा. पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार बनविण्याचा प्रयोग फसला. आता काँग्रेसमध्ये भूकंप घडवून महाराष्ट्रात उलथापालथ करायची असेल तर त्यांना कोण रोखणार? तरीही कोरोनाचे संकट आहे. मोठ्या प्रमाणावर मदत आणि पुनर्वसनाचे कार्य सरकारने शिरावर घेतले आहे. जनता जीवन-मरणाशी झुंजत आहे. मुंबईत दहा हजारांवर, महाराष्ट्रात पंचवीस हजारांवर रुग्ण संख्या गेली आहे. हे सर्व स्थिरस्थावर झाले की, पाटलांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे. पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीतला अजित पवारांचा खिळा या मंडळींनी काढला, पण तोच खिळा आज सरकारला मजबुती देत आहे. विरोधक ठाकरे सरकार खिळखिळे करण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे हे सरकार मजबूत आणि गतिमान होईल.”
दरम्यान, “चंद्रकांत पाटील काय किंवा देवेंद्र फडणवीस काय, हे आपापल्या पक्षांचे झेंडे आणि भूमिका घेऊन पुढे निघाले आहेत. 105 चा भक्कम आकडा असतानाही त्यांना सत्ता राखता आली नाही. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी त्यांच्याही मनाची अशीच तळमळ व शरीराची लाहीलाही झाली असती. सध्या खडसे, सौ. पंकजा, बावनकुळे, तावडे अशा मंडळींचीही अस्वस्थ तगमग, तळमळ सुरूच आहे. त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे,” असा टोला सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.
राज्यात अस्थिरता नको व विरोधी पक्षही अस्थिर नको असे आमचे मत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्वत:च्या पायावर मजबुतीने आत्मनिर्भर झाले आहे. त्याच आत्मनिर्भरतेचा मार्ग विरोधी पक्षाने स्वीकारला तर राज्यातील कोरोनाविरोधी लढाईस बळ मिळेल. काय हो पाटील, हे बरोबर आहे ना?, अशा शब्दात अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख
विरोधक ठाकरे सरकार खिळखिळे करण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे हे सरकार मजबूत आणि गतिमान होईल. राज्यात अस्थिरता नको व विरोधी पक्षही अस्थिर नको असे आमचे मत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्वत:च्या पायावर मजबुतीने आत्मनिर्भर झाले आहे. त्याच आत्मनिर्भरतेचा मार्ग विरोधी पक्षाने स्वीकारला तर राज्यातील कोरोनाविरोधी लढाईस बळ मिळेल. काय हो पाटील, हे बरोबर आहे ना?
मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है,
वही होता है,
जो मंजुर-ए-खुदा होता है…
महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत याची प्रचिती सातत्याने येत आहे. विरोधकांनी अनेक अडथळे व अडचणी निर्माण केल्या तरीही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे सरकार अडचणीत आणण्यासाठी राजकीय दाबदबावाचे जंतरमंतर करू पाहणारेच परागंदा झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदास कोणताही धोका नाही (तसा तो कधीच नव्हता) आणि राज्यातील महाविकास आघाडीसही इजा पोहोचणार नाही. विरोधकांचे सगळे अघोरी प्रयोग त्यांच्यावरच उलटले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना काहीही करून विधिमंडळाचे सदस्य होण्यापासून रोखावे, येनकेनप्रकारेन त्यांना रोखता आले तर सरकारची आपोआपच कोंडी होईल. तेव्हा कोरोनाचे संकट असले तरी आपला राजकीय मतलब साधून घ्यावा, असे मनसुबे काहींनी रचले. तसेच राज्यपाल नियुक्तीच्या फाईलवर चणे-कुरमुरे ठेवून ते बराच काळ खात बसावे. त्यामुळे वेळ टळून जाईल व मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल. त्यानंतर पुढे कधीतरी भल्या पहाटे शपथविधी सोहळा आटोपून टाकू, अशी स्वप्नेही काहींनी पाहिली. पण त्यांचे काहीच चालले नाही. त्यांचे मनसुबेही उधळले गेले आणि स्वप्नेही. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र राज्य अस्थिर होऊ दिले नाही. रखडलेल्या विधान परिषद निवडणुका पार पाडून मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा करावा, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यावर दुसरे काय व्हायचे? मुख्यमंत्र्यांनी निवडून येता कामा नये व त्यांची कोंडी करावी हा विचार एरव्ही एक राजकीय डावपेच म्हणून ठीक होता. राजकारणात असे ‘पेच’ पडायचेच, पण कोरोनाचे संकट जग पोखरत आहे. महाराष्ट्र त्या संकटाशी झुंज देत आहे. अशावेळी
राजकारणाचा विषाणू
विरोधकांच्या डोक्यात वळवळावा हे बरे नाही. शेवटी असे घडले की, मोदी-शहा यांनाच लस टोचून या विषाणूचा बंदोबस्त करावा लागला. राज्यपालांनाही विधान परिषद निवडणुका घ्या, अशी शिफारस करावी लागली. त्यानुसार आता या निवडणुका पार पडल्या आहेत. तरीही भाजपचे चंद्रकांतदादा पाटील यांचे म्हणणे आहेच की, ‘महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात लवकरच भूकंप होईल. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल.’ चंद्रकांतदादा अशी काही उलथापालथ घडवू पाहत असतील तर तो त्यांचा राजकीय हक्क आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एखादा लंगोट कसून मैदानात उतरायचा प्रयत्न जरूर करून पहावा. पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार बनविण्याचा प्रयोग फसला. आता काँग्रेसमध्ये भूकंप घडवून महाराष्ट्रात उलथापालथ करायची असेल तर त्यांना कोण रोखणार? तरीही कोरोनाचे संकट आहे. मोठ्या प्रमाणावर मदत आणि पुनर्वसनाचे कार्य सरकारने शिरावर घेतले आहे. जनता जीवन-मरणाशी झुंजत आहे. मुंबईत दहा हजारांवर, महाराष्ट्रात पंचवीस हजारांवर रुग्ण संख्या गेली आहे. हे सर्व स्थिरस्थावर झाले की, पाटलांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे. पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीतला अजित पवारांचा खिळा या मंडळींनी काढला, पण तोच खिळा आज सरकारला मजबुती देत आहे. विरोधक ठाकरे सरकार
खिळखिळे करण्याचा
जेवढा प्रयत्न करतील तेवढे हे सरकार मजबूत आणि गतिमान होईल. सरकारचे काही चुकत असेल तर प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार विरोधकांना आहे. पाटील म्हणतात की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कमालीचे सज्जन आहेत. श्री. फडणवीस हे सज्जन आहेत व त्याचे प्रमाणपत्र पाटील देत आहेत. स्वत: पाटील हे सुद्धा सज्जनच आहेत. त्यांच्या दुर्जनतेचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत, पण सध्याचे राजकारण ‘गटारी’ झाल्याने सज्जनांचेही मुखवटे गळून पडत असतात. हे संसदीय लोकशाहीचे दुर्दैवच म्हणायला हवे. राजकारणात तसे सब घोडे बाराटकेच असतात. त्यातल्या त्यात ते बरे. त्यांच्यावर मांड ठोकून जनतेला दिवस ढकलायचे असतात. चंद्रकांत पाटील काय किंवा देवेंद्र फडणवीस काय, हे आपापल्या पक्षांचे झेंडे आणि भूमिका घेऊन पुढे निघाले आहेत. 105 चा भक्कम आकडा असतानाही त्यांना सत्ता राखता आली नाही. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी त्यांच्याही मनाची अशीच तळमळ व शरीराची लाहीलाही झाली असती. सध्या खडसे, सौ. पंकजा, बावनकुळे, तावडे अशा मंडळींचीही अस्वस्थ तगमग, तळमळ सुरूच आहे. त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे. राज्यात अस्थिरता नको व विरोधी पक्षही अस्थिर नको असे आमचे मत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्वत:च्या पायावर मजबुतीने आत्मनिर्भर झाले आहे. त्याच आत्मनिर्भरतेचा मार्ग विरोधी पक्षाने स्वीकारला तर राज्यातील कोरोनाविरोधी लढाईस बळ मिळेल. काय हो पाटील, हे बरोबर आहे ना?
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.