HW News Marathi
महाराष्ट्र

शिवतारे 27 वर्षांपासून अलिप्त, लेकीच्या आरोपांना आई मंदाकिनींचे उत्तर

मुंबई | शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मुलीने आई-भावांवर आरोप केल्यानंतर विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त असून पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत, असा दावा मंदाकिनी यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत केला आहे. त्यामुळे शिवतारे कुटुंबातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

विजय शिवतारेंच्या पत्नीचा दावा काय आहे?

विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत लेकीचे आरोप फेटाळले. मुलगी ममता यांनी मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. त्यातील पहिली पाच वर्ष उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत मीनाक्षी पटेल यांच्यासोबत पवईस राहत आहेत. संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंच्या मानसिक जाचातून सुटका करुन घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे, असा दावा मंदाकिनी शिवतारे यांनी केला आहे.

ममता शिवतारे लांडेंचे आरोप काय आहेत?

“मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठं कारण आहे. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारखं जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिलं. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरचं स्थान आहे. अश्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे” असं ममता यांनी विजय शिवतारे यांच्या फेसबुकवरुन लिहिलं आहे.

“आजारी वडिलांचा भावांकडून मानसिक छळ”

“मागील वर्षी जानेवारी 2020 मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांची बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता 20 टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले.” असा आरोप ममता यांनी केला आहे.

“वडिलांची सोशल मीडियाद्वारे बदनामी”

“आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय, विनस आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी 2021 मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे.” असंही ममता यांनी लिहिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता वस्त्रहरण अटळ आहे!”, नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

News Desk

महाविकासआघाडीवर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरेंचे असे आहे ‘शॅडो कॅबिनेट’

swarit

शरद पवार, आशिष शेलारांसह उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट

News Desk