HW News Marathi
महाराष्ट्र

पाणी शेतातही अन् डोळ्यातही… हिंगोलीतील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला; काय झालं?

शिवशंकर निरगुडे | मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसामुळे लाखो हेक्टर शेतीत पाणीच पाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

राज्यात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक ठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा लाखो हेक्टर पिकावर सध्या टांगती तलवार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नुकत्याच पेरलेल्या कोवळ्या पिकांना फटका बसला आहे. पिकांत पाणी साचून राहत असल्यामुळे तूर, सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग ही पिके पिवळी पडू लागली आहेत.

हिंगोली जिल्ह्यात सोमवारपर्यंत वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस झाला आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यानंतर तीन दिवस उघडीप दिल्यानंतर रविवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे पिकामधील अंतरमशागतीचे काम खोळंबले असून पिकांमध्ये वाढत चाललेल्या तणामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतात पिके लहान अन् तण मोठे असे चित्र दिसू लागले आहे.

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत २.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ ३४ हजार ७७५ हेक्टरवर तुर, ५९०८ हेक्टरवर मुग तर ४३४० हेक्टरवर उडीदाची पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ २९ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. या पिकांमध्ये अद्याप अंतरमशागतच झाली नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची उघडीपीची प्रतीक्षा लागली आहे.

हिंगोलीत सरासरी ५१६ मि.मी पाऊस

जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ३९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरी ५१६ मिलीमिटर पाऊस झाला असून त्याची टक्केवारी ६० टक्के आहे. पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर, सिद्धेश्वर, येलदरी ही धरणं भरण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर विहीर, तलाव, पाझर तलाव, नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गाल सर्वांनाच रंगवता येतात”, प्रवीण दरेकरांचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

Jui Jadhav

“स्वतःची तिजोरी फुल जनतेची मात्र दिशाभूल”-नितेश राणे

News Desk

भाजपमधील २-४ जणांचं मानसिक संतुलन ढासळलंय, त्यातलेच एक पडळकर ! मिटकरींचा घणाघात

News Desk