मुंबई | अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनाने आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात राजापेठ येथील उड्डाण पुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला. तर यावरून जिल्ह्यातले राजकारण चांगलेच तापले. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर, जिल्ह्यातील शिवभक्त आणि राणा समर्थकही यावरून संतप्त झाले आहेत.
राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवारी (१२ जानेवारी) मध्यरात्री आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून नवनिर्मित राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. यासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या पूर्वपरवानगी न घेण्यात आल्यामुळे पुतळा सन्मानपूर्वक हलविण्यात यावा. यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता असून आमदार रवी राणा यांनी महानगरपालिकेत बैठक घेऊन या पुतळ्याला सर्व परवानग्या तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी केली होती. तर इथून पुतळा हलविल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा सुद्धा रवी राणांनी दिला होता.
आता अमरावती राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने हटवला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा पुतळा हटवण्यात आला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर तसेच राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर राणा समर्थक आक्रमक झाले होते.
जनभावनेचा अनादर या मोगलाई सरकार – शिवराय कुलकर्णी
प्रकरणी भाजपने देखील यात उडी घेतली आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केल्यामुळे जिल्ह्यातील जनता आनंदित होती, असे त्यांनी सांगितले. अमरावतीच्या शिवप्रेमींमध्ये यामुळे अत्यंत आनंदाची लाट होती. पुतळा उभारल्यापासून जिल्ह्यात दररोज महाआरती व्हायची, असे सांगत महाविकास आघाडी आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. जनभावनेचा अनादर या मोगलाई सरकारने केला आहे, असा आरोप शिवराय कुलकर्णी यांनी केला. तर, हिंदूच्या भावना शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर दुखावल्या गेल्या असल्याची संतप्त प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी दिली. तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला व पुतळा हटवला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
महाराजांचा पुतळा येथे उभारत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करणार – युवा स्वाभिमानच्या कार्यकर्ते
तर काही शिवप्रेमींनी आणि युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते म्हणाले की शिवरायांच्या या पुतळ्याला अधिकृत करा, असे पत्र आमदारांनी लिहिले होते. पण, पालकमंत्री यशोमती ठाकूर जिल्ह्यात आल्यानंतर हा पुतळा हटवण्यात आला आहे. तसेच ज्यांनी या पुतळ्याला विरोध केला त्यांचा आम्ही निषेध करतो. तर जो पर्यंत पुन्हा महाराजांचा पुतळा येथे उभारत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. तसेच शिवजयंतीला पावत्या फडणारे आता कुठे झोपून राहिलेत असा सवालही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
रवी राणांच्या समर्थकांनीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट
दरम्यान आता रवी राणांच्या समर्थकांनीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी राणांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन आपला पाठिंबा दर्शवला. ‘रवी राणा आगे बढो, हम तुमहारे साथ है’ अशा घोषणेसह छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा नाराही दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यानंतर आता नवनीत राणांनी आपल्या घराबाहेर समर्थकांमध्ये सामील होत. या प्रकरणाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. तर यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या की, या ठिकाणी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे स्मारक उभारण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून शिवभक्त परवानगी मागत आहेत. पण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आम्हाला कोणत्याही परवानगीची गरज नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा वाढली होती. तर पोलिसांनी काही महिला समर्थकांना ताब्यात घेतलंय. तर आता या प्रकरणाचे महाराष्ट्र पुढे काय घडणार? शिवप्रेमी आणि रवी राणा व समर्थक नेमकी कोणती भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.