मुंबई | कोरोनाग्रस्तांची सद्यस्थितीला महाराष्ट्रातील संख्या ६३ वर पोहोचली असून भारतातील ही संख्या २५५ झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगर प्रदेशासह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या चारही महत्त्वाच्या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे या सारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील अशी माहिती काल (२० मार्च) मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी दिली. त्यामुळे कोणीही बाहेर फिरायला जाऊ नका. ही फिरण्यासाठीची सुट्टी नसून हे आपणच आपल्यावर घातलेले एकप्रकारचे बंधन आहे. त्यामुळे घरातच बसा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जनतेला केले. गर्दी कमी करण्यासाठी खासगी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयांतील संख्या ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, चार शहरांमधील बंद हा ३१ मार्चपर्यंत नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
बस, ट्रेनमधील गर्दीला आवर घालण्यासाठी शक्य तिथे ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना हे शक्य नाही, त्या बंद ठेवण्यात याव्यात तसेच बंद होणाऱ्या कंपन्यांनी माणुसकीच्या नात्यातून तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करू नयेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘मातोश्री’वरून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केले. तसेच, वारंवार, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री सामान्य नागरिकांच्या संपर्कात आहेत.
रविवारी २२ मार्चला असणाऱ्या जनता कर्फ्यूच्या दिवशी ‘नागरिकांनी घराबाहेर पडू नये. जगण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत असतो. पण आता जगण्यासाठी घरात थांबावे लागेल. रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या अत्यावश्यक सेवा आहेत. त्या बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी इच्छित स्थळी पोहोचणार नाहीत. त्यामुळे रेल्वे आणि बस सुरूच राहतील. मात्र रेल्वे आणि बसमध्ये गर्दी करू नका. तुमची काळजी घेण्यासाठी ही सुट्टी देण्यात येत आहे, फिरण्यासाठी नाही’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या परिने डॉक्टरांना, सरकारला शक्य ती मदत करावी आणि कोरोनाच्या या संकटातून लवकरात लवकर भारत मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करुयात.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.