HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

मुंबई ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई
( Mumbai) अधिक वेगानं धाऊ शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहेच, येणाऱ्या काही दिवसात महापालिका निवडणुका होतायत, तेव्हा विकासाचे हे डबल इंजिन ‘ट्रिपल इंजिन’ होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी सांगितले. वांद्रे –कुर्ला संकुलात आज (१९ जानेवारी) मुंबईतील ३८ हजार कोटीपेक्षा जास्त विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींची यांची प्रमुख उपस्थिती होती. टीकेला कामाने  उत्तर देऊ असेही त्यांनी भाषणात स्पष्ट केले.
सुवर्ण अक्षरात नोंद करावी असा दिवस
 मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याची सुरूवात आहे. येत्या दोन वर्षांत त्याचा कायापालटही पहायला मिळेल आणि आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते ऑक्टोबर 2015 मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते आणि त्यांच्याच हस्ते आज उद्घाटनही होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता, लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता. त्यातून या राज्याची आणि जनतेची सुटका करण्याची भाग्य मला मिळाले ते आदरणीय मोदीजी सारख्या धाडसी नेत्यामुळेच असे मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले.
बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदीजी यांचे जिव्हाळ्याचे असे नाते होते. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा या दोघांच्याही विचारांचा समान धागा होता आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. तेच सुत्र धरुन अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचे भूमीपूजन करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांना आम्ही मुंबईत आमंत्रित केले आहे असेही त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.
महाराष्ट्राच्या समृद्धीची सुरुवात
गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये देशातल्या गेमचेंजर समृद्धी महामार्गाची सुरुवात झाली. आता नव्या वर्षाची सुरुवात आपण मुंबईकरांसाठी मेट्रो सुरु करून करतो आहोत. एक कार्यक्रम राज्याच्या उपराजधानीत  झाला आणि आज राज्याच्या राजधानीत हा अभूतपूर्व सोहळा होतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे राज्यात “समृद्धी” दाखल होत आहे.
समृद्धी असो, मेट्रो असो किंवा येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणारा समुद्रावराचा सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प असो. आम्ही रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग उभारून देशातला एक आदर्श असा वाहतूक आणि दळणवळण आराखडा जगासमोर ठेवत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आम्ही मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरु करतोय. ही मेट्रो लवकरच लाखो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई महानगरात ३१४ किमीचं मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या नेटवर्कमुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील. वेळेची बचत होईल. प्रदुषण कमी  होईल.  कोस्टल रोडचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून  नवी मुंबई मेट्रो लवकरच सुरु होईल असही ते म्हणाले
 विकासाला मानवी चेहरा देणार
गेल्या सहा महिन्यात आम्ही जे काम केले आहे, त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे, आणि एकदा विश्वास टाकला की, मुंबईकर त्याची  साथ कधीही  सोडत नाही  हा इतिहास आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की, केवळ रस्ते, पूल बांधणे म्हणजे विकास नाही. आपण नेहमी म्हणतो की, विकासाला मानवी चेहरा पाहिजे. आज आम्ही आणखी एक स्वप्न सत्यात उतरवतो आहोत ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु करतोय. मुंबईतील सांडपाणी पुनर्प्रक्रिया, रस्त्यांचे कॉक्रिटीकरण, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुशोभीकरण हे सगळंच आता मार्गी लागणार आहे. मुंबई हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होणार आहे.
मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे  कॉंक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून याचीही सुरुवात आज होते आहे. काँक्रीटीकरण केल्यानंतर किमान २५ वर्ष रस्ते सुस्थितीत राहतील. संपूर्ण मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या या निर्णयाला सर्वांनी पाठींबा दिला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी
हा मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाऊ नये याला आमचं प्राधान्य आहे. सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवतो आहोत. पुनर्विकासाला ती आणतो आहोत, पोलिसांना, कामगारांना घरे देत आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी  धारावी पुनर्विकासाचे उदाहरण दिले.
यावेळी त्यांनी राज्य शासनाने सामाजिक भावनेतून घेतलेल्या निर्णयांविषयीही सांगितले.  पेट्रोल डिझेलचे दर कमी करणे, स्वतंत्र दिव्यांग विभाग, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, दिवाळीत शंभर रुपयांत शिधा, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन, चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा दुपटीने जास्त मदत असे अनेक निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
दावोस दौऱ्यात अनेक उद्योजकांबरोबर बैठका झाल्या. प्रत्येकाने पंतप्रधानांबद्दल जो आदर व विश्वास व्यक्त केला. ते आमचे नेते व मार्गदर्शक आहेत याचा अभिमान तर आहेच, पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी  महाराष्ट्राला मिळालेल्या गुंतवणुकीविषयी माहिती दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय नौसेनेत कोरोनाचा शिरकाव, २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ‘हे’ महत्वाचे निर्णय

News Desk

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

Aprna