HW News Marathi
महाराष्ट्र

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यास सुदृढ होण्यासाठी मदत करणार – मुख्यमंत्री

मुंबई | माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्राचे निर्माण करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.या मोहिमेची राज्यभर अमलबजावणी सुरु झाली असून स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्य विषयक माहितीचे संकलन करत आहेत. लोकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत, यामध्ये कोरोना बाधित, बरे झालेले रुग्ण, त्यांची पोस्ट कोविड स्थिती याबाबत माहिती घेत आहेत. लोकांना असलेल्या इतर आजारांची, त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती घेत आहेत. काल त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण आणि पुणे विभागाचा कोरोना विषयक आढावा घेतला तेव्हा काल (२५ सप्टेंबर) ते बोलत होते.

अनलॉक प्रक्रियेमध्ये आता दळवणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करायला हवे, त्यादृष्टीने लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, मोहिमेत राज्यातील जनतेला मोठ्याप्रमाणात सहभागी करून घेऊन मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. करोनाला दूर ठेवून सुरक्षित राहण्यासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी २५ टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समाधान व्यक्त केले. स्थानिक पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण राज्यात ५५ हजार २६८ आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून, काल अखेर७०.७५ लाख कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे.

पुणे महसूल विभागातील पाच जिल्‍ह्यांशी दृकश्राव्‍यप्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. उपमुख्‍यमंत्री व पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांगली जिल्‍ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सातारा जिल्‍ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री दत्‍तात्रय भरणे, कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्‍य मंत्री सतेज पाटील यांच्‍यासह पालकसचिव तसेच जिल्‍हाधिकारी सहभागी झाले.

यावेळी मुख्‍यमंत्री म्‍हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्‍यासाठी आपल्‍याला एका निश्चित मार्गाने जावे लागणार आहे. कोणतीही मोहीम यशस्‍वी होण्‍यासाठी त्‍यामध्‍ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा. कोरोनावरील लस उपलब्‍ध होईल तेव्‍हा होईल, तथापि, आज आपण उपचार पध्‍दती, जनजागृती याद्वारे या संकटाचा प्रभावीपणे सामना करु शकतो. मास्‍क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्‍ट अंतर पाळणे यावरही आपण सर्वांनी भर दिला पाहिजे. समाजामध्‍ये दोन प्रकारचे लोकं दिसत आहेत. मनात प्रचंड भीती असलेले आणि दुसरे बेपर्वाईने वागणारे की जे मास्‍क वापरत नाहीत, अंतर पाळत नाहीत. कोरोना पॉझिटीव्‍ह असलेल्या परंतू लक्षणे नसलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्‍याचा धोका असतो. त्‍यांच्‍या माध्‍यमातून होणारा संसर्ग कोणासाठी तरी घातक ठरु शकतो, असेही ते म्‍हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे सारंगखेडा चेतक महोत्सव २०१८

News Desk

बुरा न मानो होली है… संजय राऊत यांचे सूचक ट्विट

News Desk

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्‍घाटन

Aprna