जळगाव | जाती व्यवस्था संपली म्हणणाऱ्या प्रत्येकाच्या थोबाडात जोरदार चपराक बसावी अशी घटना जळगावच्या जामनेर येथे घडली आहे. शाहू , फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अद्याप जाती व्यवस्था नष्ट झाली नसल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. 9 जून रोजी जळगाव येथे जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावात रहाणा-या मातंग समाजातील मुलांना विहीरीत अंघोळ केल्यामुळे प्रचंड मारहाण करण्यात आली आहे.
नक्की काय आहे प्रकरण
जळगाव मधील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात राहणारी मातंग समाजाची तीन मुले भटका जोशी समाजातील एका विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. हा प्रकार समजताच या तिघांना नग्न करुन मारहाण करण्यात आली आहे. केवळ या मुलांना मारहाण करुन न थांबता त्यांची गावात नग्न धिंड काढण्यात आली. या सर्व प्रकारची चित्रफीत करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होताना दिसून येत आहे.
अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून नोंदवला निषेध
कॉंग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेत काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी विहीरीत पोहले म्हणून मातंग समाजाच्या मुलांना नग्न करून मारहाण करणे व त्याचा व्हिडीओ बनवणे ही पुरोगामी महाराष्ट्राला आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचे म्हटले आहे. भाजपचे सरकार आल्यापासून वारंवार अशा घटना घडत आहेत. भाजपची दलित विरोधी मनुवादी मानसिकता याला कारणीभूत असल्याची जोरदार टीका चव्हाण यांनी भाजपवर केली आहे.
त्याचबरोबर काँग्रेसचे पथक शुक्रवारी सकाळी जळगावच्या वाकडी येथे जाणार आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे पथक जळगाव जिल्ह्यातील जामवाकडी तालुका जामनेर गावी तात्काळ जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे तसेच पोलीस अधिका-यांना भेटून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे. या पथकात माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, माजी खा. व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील यांचा समावेश असेल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे.
वाकडी गावास रामदास आठवले 16 जून ला देणार भेट
रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. या प्रकरणी आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रकरणातील पीडित मातंग समाजाच्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार 16 जून रोजी जामनेर मधील घटना घडली त्या वाकडी गावास भेट देणार आहेत.
वाकडी गावात मारहाण झालेली तिन्ही मुले ही मातंग समाजाची असून अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांना जबरी मारहाणीचा गुन्हा आणि एट्रॉसिटी ऍक्ट नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे यासाठी जळगाव चे जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार तसेच संबंधित गावात दोन्ही समाजाला शांतता पाळण्याचे आवाहन करण्यासाठी त्या गावास शनिवारी आपण भेट देणार असल्याचे रामदास आठवलेंनी प्रसारमाध्यमांना कळविले आहे.
दलित अत्याचारांच्या घटनांचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे. अनुसूचित जातीजमातींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नांवरून कोणी राजकारण करू नये. जातीय अत्याचार हा राजकीय प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे. जातीय अत्याचाराचा मुद्दा सामाजिक दृष्ट्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सोडविला पाहिजे. जातीभेद निर्मूलनासाठी सामाजिक प्रबोधन झाले पाहिजे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
गुजरात मधील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व वकील असलेले दलित समाजाचे तरूण नेते व आंबेडकरवादी कार्यकर्ते जिग्नेश मेवानी यांनी देखील त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलच्या माध्यमातून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.
Now, Una happens in Maharashtra. Dalit boys are humiliated and beaten up only for jumping into the well of non dalit caste people. Had the justice be ensured to the victims of Una, this wouldn't have happened. 1/2 pic.twitter.com/rYL9vR2Olw
— Jignesh Mevani (@jigneshmevani80) June 14, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.