HW News Marathi
Covid-19

मोदीजी, कोरोनामुळे हजारो चिता जळत आहेत, आता तरी जनतेच्या जिवीतास गांभीर्याने घ्या !- नाना पटोले

मुंबई | कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या परंतु सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा पोरकटपणा करत राहिले.

राहुल गांधींनी वेळोवेळी केलेल्या विधायक सूचनांना मोदी सरकारने गांभीर्याने घेतले असते तर आज देशात हजारो चिता जळतानाचे विदारक चित्र पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती. आतातरी मोदी सरकारने झोपेतून जागे व्हावे आणि १३० कोटी जनतेच्या जिवीताकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रूग्णसंख्येत दररोज दोन लाखांपेक्षा जास्त रूग्णांची भर पडत आहे तर हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसीवीर व ऑक्सीजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत आणि अंत्यसंस्कारासाठीसुद्धा रांगा लावाव्या लागत आहेत असे विदारक चित्र देश उघड्या डोळ्यांनी पहात आहे.

परंतु केंद्रातील भाजप सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. देश कोरोनाच्या आगीत होरपळत असताना देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. हा बेफिकीरपणाच आज देशातील जनतेच्या मुळावर उठला आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारला आर्थिक पातळीवर होऊ शकणारे नुकसान तसेच वैद्यकीय क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांवर सूचना करत असताना देशाचे पंतप्रधान मात्र जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावायला सांगत होते. १२ फेब्रुवारी २०२० रोजी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिला होता आज एक वर्षानंतरही तीच परिस्थिती कायम आहे.

नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, कोणतीही पूर्वसूचना न देता व नियोजन न करता अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ऐतिहासिक रसातळाला गेली. लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सूचना राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली होती पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्याची फळं देशातील गरीब जनता भोगते आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे जगभरात उपलब्ध असणा-या लसींना परवानगी देऊन देशातील लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना राहुल गांधी केली होती. त्यावेळी राहुल गांधी औषध कंपन्यांसाठी लॉबिंग करत असल्याचा पोरकट आरोप केला आणि नंतर चार दिवसातच केंद्र सरकारने परदेशी लसींना परवानगी दिली.

कोरोना लसीकरणासाठी वयाची अट शिथील करून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मागणी आम्ही केली आहे. सरकारने त्यावर गांभीर्यांने विचार करून तातडीने निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल.

कोरोना महामारीच्या वर्षभराच्या काळात विरोधी पक्षांसह अनेक तज्ञांनी केलेल्या सूचनांकडे मोदी सरकारने डोळेझाक करून आपले राजकीय अज्ञान उघड केले आहे. राज्यातील भाजप नेतेही कोणालाच गांभीर्याने घेत नाही अशी विधाने करून या महामारीच्या काळात हीन राजकारण करत आहेत.

केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी सतत विरोधी पक्षांच्या सरकारवर टीका करणे हा एककलमी कार्यक्रम भाजप नेत्यांनी हाती घेतला आहे. संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करणे अपेक्षित असताना आपले राजकीय दुकान चालू रहावे यासाठी त्यांची धडपड सुरु असून भाजपाचा विकृत चेहरा आता जनतेसमोर आला असून जनताच आता त्यांना गांभीर्याने घेणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाप्रमाणे ‘हे’ देखील संकट थोपवून मागे परतवू !

News Desk

कर्जदारांना मोठा दिलासा, कर्ज न भरण्याची मुभा आणखी ३ महिन्यांनी वाढवली

News Desk

‘महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, प्रकाश जावडेकरांची भडकले!

News Desk