HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणबंदी घातली तर…राणेंचा सरकारला इशारा !

मुंबई | गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ असा टोलाही यावेळी राणेंनी मुंबईत पत्रकार परिषदेत लगावला. भाजप नेते आशिष शेलार यांच्यानंतर नारायण राणे यांनीही चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याची मागणी केली.

“कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल.” असं नारायण राणे म्हणाले.

“शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनेचे मंत्री आणि नेते यांचे ऐकले जात नाही. महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. शिवसैनिकांचा कोणी विचारत नाहीत, अशी स्थिती आहे.” असे राणे म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत यावर देखील राणेंनी वक्तव्य केले आहे.

शिवसेनेकडे मुलाखत घ्यायला माणसे नाहीत, असे दिसत आहे. पण किमान ज्यांची मुलाखत घेतली, ते अनुभवी तरी आहेत. आधी ज्यांची घ्यायचे ते सगळे वाचून बसायचे. ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ अशी त्यांची स्थिती आहे.” असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. काही दिवसांपूर्वीच “जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे,” अशी खरपूस टीका देखील राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली होती.

Related posts

“ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतस‍िंह कोश्यारी यांना प्रथम पारितोषिक

News Desk

मुख्यमंत्र्यांनी आता राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे !

News Desk

जे औरंगजेब देखील करु शकला नाही ते नरेंद्र मोदी करु शकतात !

News Desk