HW News Marathi
महाराष्ट्र

संपूर्ण देशाला एक नवीन रस्ता दाखवूया, वर्धापन दिनी शरद पवारांचे आवाहन!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस हा समाजातील उपेक्षित घटकांच्या पाठिशी राहतो असं नाही तर त्यांच्या हातात निर्णय घेण्याची प्रक्रिया सुपूर्द करुन त्यांच्यामार्फत सर्व घटकांचे प्रश्न सोडवून घेणारा, त्या घटकातील नेतृत्वाची फळी तयार करणारा एक पक्ष काम करतोय हे चित्र निर्माण करुन अधिक जोमाने या कामाला लागुया आणि यामधून संपूर्ण देशाला एक नवीन रस्ता दाखवूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन आज प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी अनेक घडामोडींना व विषयांना हात घालत राजकीय विरोधकांना चांगलीच चपराक लगावली आहे.

मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जागेचा गंभीर प्रश्न असेल ते आपल्याला सोडवावेच लागतील. त्यामुळे तुमची सत्ता अधिक हातामध्ये गेली पाहिजे. सत्ता एकाएकाच ठिकाणी राहिली तर ती सत्ता भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे आणि अधिक लोकांच्या हातामध्ये गेली हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एस्सी, एसटी, आणि ओबीसी असतील त्यातल्या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे हे वाटलं पाहिजे याची काळजी आपण घेऊया. अशामुळे आपल्याला लोकांचा अधिक पाठिंबा मिळेल अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

एक वेगळया विचाराचे सरकार आपण स्थापन केले. कधी कुणाला पटले नाही की, सेना आपण एकत्र येऊन काम करू. पण पर्याय दिला. सुदैवाने तो पर्याय लोकांनी स्वीकारला आहे. तिन्ही पक्षाच्या लोकांनी त्या पर्यायाची बांधिलकी ठेवून योग्य रीतीने पावलं टाकायला सुरुवात केली त्याचा परिणाम आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत असल्याची पोचपावती शरद पवार यांनी दिली.

कुणी काही म्हणो सरकार बनवण्याच्या दिवसानंतर चर्चा आणि वर्तमान पत्रात व टेलिव्हिजनचं डिस्कशन… किती दिवस… किती आठवडे… किती महिने काढेल असं होतं. पण आता कोण चर्चा करत नाही. काल – परवा थोडीफार चर्चा झाली परंतु मला त्या चर्चेची चिंता वाटत नाही. राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले त्याअगोदर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले व काही चर्चा विनिमय केले. त्यांनी काही करो पण लगेचच वेगवेगळ्या प्रकारच्या शंका व वावड्या उठवायला महाराष्ट्रात सुरुवात झाली. त्यावर यत्किंचितही विचार करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्टपणे शरद पवार यांनी सांगितले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता शिवसेना यामध्ये आली आहे. शिवसेनेसोबत कधी काम आम्ही केले नाही पण महाराष्ट्र शिवसेनेला अनेक वर्षे पहातोय. या सर्वांवर पूर्वीचा अनुभव निश्चितपणे विश्वास असणारा आहे हे सांगतानाच ज्यावेळी जनता पक्षाचे राज्य आले. त्यानंतरच्या निवडणूकीच्या कालखंडात त्यावेळी कॉंग्रेसचा सगळीकडे पराभव झाला असताना अशा स्थितीत कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला होता तो पक्ष म्हणजे शिवसेना.

तो नुसताच पुढे आला नाही तर त्यांनी इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. एकही उमेदवार उभा करणार नाही अशी भूमिका एक नेता घेता विचार करा त्या नेत्याची काय स्थिती असेल पण त्याची चिंता बाळासाहेबांनी केली नाही. शब्द दिला इंदिरा गांधींना आणि तो शब्द पाळला हा इतिहास विसरता येणार नाही हे उदाहरण शरद पवार यांनी यावेळी दिले.

शिवसेनेने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्याचे काम याठिकाणी केले जाईल असं काहीतरी कदाचित कुणी मांडत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहत आहेत असा जबरदस्त टोलाही शरद पवार यांनी लगावला आहे.

आज आपण २२ वा वर्धापन दिन साजरा करतोय. सत्ता ही महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे. पण त्याचबरोबर नेतृत्वाची फळी तयार करण्याची कामगिरी होतेय ही माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाजी पार्कवर राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आज या निर्णयाला महाराष्ट्राने व देशाने मान्य केले आहे. याचे शंभर टक्के श्रेय तुम्हा सर्वांच्या पाठिशी उभा राहणारा सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाशी बांधिलकी ही कायम ठेवली पाहिजे असेही शरद पवार म्हणाले.

तुम्हा सहकार्यांच्या कष्टातून, जनतेच्या बांधिलकीने आज आपण २२ वर्ष पूर्ण करत आहोत. जनमाणसामध्ये आपली शक्ती वाढविण्यासाठी व त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी यशस्वी होतोय. कधी सत्तेत होतो. १५ वर्ष सत्तेत होतो. काही वर्ष सत्तेमध्ये नव्हतो त्याचा फारसा परिणाम आपल्यावर झाला नाही हा काही लोक गेले असतील पण काही ते गेल्यावर नवीन लोक तयार झाले. नवीन नेतृत्व तयार झालं. आज मंत्रीमंडळात अनेक सहकारी असे आहेत ते अत्यंत महत्त्वाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. आणि यापूर्वी त्यांच्यातील कर्तृत्व लोकांच्या नजरेसमोर आले नव्हते. ज्याचा उल्लेख याठिकाणी झाला ते राजेश टोपे इथे आहेत. एवढं मोठं कोरोनाचं संकट आलं. संबंध देशात आणि जगात आरोग्याची समस्या निर्माण झाली. अशा स्थितीत देशातील एकंदरीत चित्र पाहिलं तर अधिक गंभीर स्थिती महाराष्ट्रात होती. महाराष्ट्रातील या गंभीर स्थितीला सामना करण्यासाठी व लोकांना दिलासा आणि विश्वास देण्यासाठी ज्यापध्दतीने आरोग्य खात्याने राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली काम केले त्याचा परिणाम या सगळ्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो हा विश्वास सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला. म्हणून राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे व अनेक सहकारी यांनी आपापली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. आणि यामधून संधी होती तशी कस दाखवण्याची स्थिती होती त्यामध्ये आपण यशस्वी झालो. संबंध महाराष्ट्राला एक नेतृत्वाची फळी पुन्हा एकदा उभी करुन विश्वास देण्याचे काम राष्ट्रवादीने केल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राजकारणात सतत नवीन पिढीला प्रोत्साहित करण्याचं काम केलं पाहिजे. संधी दिली पाहिजे. आणि उत्तम काम करत असताना त्याच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. आज महाराष्ट्रात राष्ट्रवादीत युवक, महिला आणि अल्पसंख्याक मध्ये काम करणारे लोक आहेत. त्यांच्याकडे बारकाईने लक्ष दिले व पाठिंबा दिला तर एकप्रकारचा विश्वास येतो की यानंतरच्या काळात उद्या महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची कुवत असणारी एक पिढी राष्ट्रवादीतून तयार होतेय त्याला प्रोत्साहित करण्याचे काम केले पाहिजे असेही शरद पवार यांनी सांगितले.

आजच्या दिवशी म्हणजे २२ वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी महत्त्वाचा राजकीय एक निर्णय घेतला आणि एक संघटना उभी करण्याची जी भूमिका स्वीकारली ती योग्य होती. जनतेने त्याला कोणत्या पध्दतीने पाठिंबा दिला त्याचा आढावा घेण्याचा हा आजचा दिवस आहे. समाधानाची गोष्ट ही आहे की राजकीय पक्षाची निर्मिती केल्यानंतर हा पक्ष सतत पुढे जात होता. व त्याला लोकांचे समर्थन मिळत होते. या देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. काही टिकले. काही कधी गेले हे कळले नाही. १९७७ मध्ये या देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जयप्रकाशजींच्या आदेशाने एक सरकार आले. देशाच्या जवळपास ११-१२ राज्यात सत्ता आली पण ती दीड – दोन वर्षापेक्षा जास्त टिकू शकली नाही याची आठवण शरद पवार यांनी यावेळी करुन दिली.

कोरोना काळात गोरगरीब जनतेला मदत करण्याचे काम सरकारने केले. केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य दिले होते. ते गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आले. शिवभोजन थाळी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला. या संकटाच्या काळात आपण थांबलो नाही, डगमगलो नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.

१९९९ पासून आपला पक्ष सत्तेत आला. पुढील १५ वर्षे पक्ष सत्तेत राहिला. आम्हा सगळ्यांनाच सुरुवातीपासून पक्षाच्यावतीने पवारसाहेबांनी मोठी जबाबदारी दिली. आज मागे वळून पाहताना पवारसाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शातून पक्ष पुढे आला असल्याचे स्पष्ट होते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारसाहेबांच्या राजकीय आयुष्यातील ही २२ वर्षे फार महत्त्वाची आहेत. राजकीय आयुष्य जगताना ते स्वाभिमानाने व सर्वधर्मसमभावाने कसे जगावे, हे आपल्याला शिकवले.दिल्लीच्या तख़्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकला नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

देशाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठी लाट देशात आली. आपल्या पक्षाचे अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. पण पवारसाहेबांनी हिंमत हारली नाही. २०१९ साली साहेबांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यसरकारमधील पक्षाच्या सर्व नेत्यांनी आपल्या जबाबदारीचे भान राखून जनतेच्या हिताचे काम केले आहे. राज्यसरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.

कोरोना काळात राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आर्थिक घडी योग्यरित्या घालण्याचे काम अजितदादांनी केले. पक्षाच्या फ्रंटल सेलच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जागर रोजगाराचा हे नवीन अ‍ॅप होतकरू युवकांसाठी सुरु करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. युवती काँग्रेसच्या माध्यमातून दिव्यांग युवतींना मदतीचा हात दिला गेलाय. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी महिला काँग्रेसच्यावतीने पक्ष घरोघरी नेण्याचे काम करण्यात आले.

पक्ष बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात यापुढेही अधिक जोमाने काम केले जाईल. पुढील काळात पक्षाच्यावतीने आरोग्य दिंडी हाती घेतली जाणार आहे. यातून लोकांमध्ये कोरोना, म्युकरमायकोसिस, लसीकरणासारख्या विषयांची जागृती करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरोना संक्रमण कमी झाल्यावर पक्ष बळकटीसाठी महाराष्ट्र दौरा आखला जाईल. यातून कार्यकर्त्यांशी थेट बोलण्याची संधी मिळेल. तसेच आजपासून पक्षाच्या सभासद नोंदणीचे काम सुरू करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीसोबत पारंपरिक पत्रकाच्या पद्धतीने सर्वांना नोंदणी करता येईल. आजपर्यंत आपण सर्वांनी पक्षाला साथ दिली आहे. यापुढेही पक्ष वाढविण्याचे काम आपण करूया असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांचे त्यांच्या पक्ष उभारणीसाठीच्या मेहनतीबद्दल आणि त्यागाबद्दल अभिनंदन केले आणि आभारही मानले. कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा कणा असतो. कार्यकर्त्यांशिवाय पक्षाला वैभव प्राप्त होत नाही. राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे ज्याला राज्यातील जनतेचे प्रचंड प्रेम लाभले आहे. २०१४ चा अपवाद वगळता मोदींची लाट वगळली.

तर राज्याच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर कायम विश्वास व्यक्त केला व राज्यातील सत्तेची जबाबदारी सांभाळण्याची संधी दिली. पूर्ण क्षमतेने दिली नसेल परंतु आघाडीच्या निमित्ताने त्याबद्दल राज्यातील तमाम जनतेच्या प्रेमाच्या बळावर महाराष्ट्राच्या गावागावात व मनामनात जागा बनवली व भक्कम केली आहे असेही अजित पवार म्हणाले.

जातपात, धर्म, पंथ, प्रांत कुठलाही भेदभाव न करता समाजातील सर्व घटकांना घेऊन पक्ष वाटचाल करत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे हित सर्व समाज घटकांना विकासाची संधी उपलब्ध करुन देत ही वाटचाल पुढे देखील सुरू राहणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ज्याप्रकारे महाराष्ट्र राज्याची स्थापना संघर्षातून झाली तशाच प्रकारे संघर्षातून राष्ट्रवादीचीही स्थापना झाली. २०१४ चा अपवाद वगळला तर राज्यातील लोकांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला विश्वास व्यक्त केलेला आहे. हृद्यात महाराष्ट्र व नजरेसमोर राष्ट्र हा व्यापक विचार डोळ्यासमोर ठेवून पवारसाहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती. २२ वर्षात शेती, उद्योग, सहकार, समाजसेवा, राजकारण अशा अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वाची व कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.

या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पध्दतीने पक्ष वाढवला पवारसाहेबांच्या विचारांचे बळ दिलं आणि त्या सर्व कार्यकर्त्यांमुळे आज वर्धापन दिन कोरोनाचे संकट असताना वेगळ्या पद्धतीने कोरोनाचे नियम तंतोतंत पालन करुन साजरा करतोय असेही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी हा महाराष्ट्राच्या मातीशी व माणसांशी नातं सांगणारा पक्ष आहे. महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातून झाली तशी राष्ट्रवादीची झाली आहे. महाविकास आघाडीकडून घेतले जाणारे लोककल्याणाचे निर्णय तळागाळात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

भाजपची सत्ता आल्यापासून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता विचारांना धक्का देण्याचे काम सुरु आहे. लोकशाही टिकवून ठेवणार्‍या संस्था मोडीत निघाल्या. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची अवस्था गंभीर आहे. त्यांचे स्वातंत्र्य किती आहे. त्यांच्यावर कशाप्रकारे दबाव टाकला जातो. सगळे पत्रकार एकाच सुरात एकाच भाषेत कसं ट्वीट करतात हे बघितल्यावर लोकशाही संकटात आल्याची भीती अजित पवार यांनी व्यक्त केली.

पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्नांवर देखील आपल्याला काम करायचे आहे. मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी आपली भूमिका आहे.

आज राज्यात राष्ट्रवादीचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जनतेवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय आम्ही होऊ देणार नाही. संकटे कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही. संकटावर मात करुन हा महाराष्ट्र सर्वांच्या पुढेच राहील, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिली.

यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार प्रफुल पटेल यांनी, पक्षाची स्थापना जेव्हा झाली, तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केली होती की हा पक्ष किती दिवस टिकेल. मात्र आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात आपण पक्षाच्या स्थापनेनंतर २२ वर्षांचा यशस्वी प्रवास केला आहे, इतकेच नाही तर १७ वर्षे आपण राज्यात सत्तेत राहिलो आहोत. २०१९ मध्ये पवारसाहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवत राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्याची किमया केल्याचे प्रफुल पटेल म्हणाले.

देशात अनेक राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या. यात चित्र पाहिले तर देशाच्या राजकारणात निश्चितच उलथापालथ होत आहे. या परिस्थितीत भविष्यात देशाच्या व्यापक व्यासपीठावर पवारसाहेबांची मोठी गरज लागणार आहे. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे राजकीय वजन वाढवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता आणली. त्यांच्या वेगळ्या पक्षाची सुरुवात त्यांच्यासह अजून केवळ तीन आमदारांनी झाली होती.

पण त्यांनी कठोर संघर्ष करून त्यांच्या पक्षाला आज इतके पुढे आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर स्थापनेपासूनच सत्तेत राहिला. आपले नेते हे देशातील सर्वात अनुभवी नेते आहे. त्यामुळे त्यांना ताकद देऊन त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा करण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहनही प्रफुल पटेल यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूकीत राष्ट्रवादीचे अरूण लाड यांचा विजय!

News Desk

भिलवडी पुरग्रस्त भागाला उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, बोटीतून केली पाहणी

News Desk

ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणावर भर द्या ! नाना पटोले

News Desk