मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविषयी ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देखील जितेन गजारियावर टीका करत थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘बरं झालं, रश्मी ठाकरेंना फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाहीतर ती डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती’, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
राजकारणामध्ये नेहमीच एकमेकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोप सुरु असतात. मात्र, कधीकधी काहीजण प्रत्यारोपाची मर्यादा ओलांडतात. सध्या सोशल मीडियावर रश्मी ठाकरेंवरही अशाच आक्षेपार्ह प्रतिक्रिया समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जितेन गजारीयाने रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करत त्यांची तुलना राबडी देवींशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र, त्याने केलेल्या ट्विटवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून विद्या चव्हाणांनी देखील याचा निषेध केला आहे. तसेच यात त्यांनी अमृता फडणवीसांनाही ओढलं आहे. चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळलेत…
चव्हाण म्हणाल्या, “हे सर्व प्रकरण पाहून मला एक मजेदार किस्सा आठवला. जितेन गजारीयाने जर राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल, तर रश्मी ठाकरे खूपच नशीबवान आहेत. कारण ती घरदार व चूलमूल सांभाळणारी एक संसारी स्त्री होती. तिला बिहारची मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसतीच डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची तशी वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावंसं वाटतं. तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळलेत, त्याविषयी ट्विट केले तर बरं होईल”, अशा शब्दात त्यांनी अमृता फडणवीसांसह भाजपला टोला लगावला आहे.
भाजपवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ
पुढे त्या म्हणाल्या, “अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना राजकारणात ओढणं हे योग्य नाहीये. लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवींना मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं असेल तर त्याचं कौतुकच वाटलं पाहिजे. परंतु,यावरून भाजपच्या सेलला अक्कल राहिली नाही हे लक्षात येतं. कमळ हे डबक्यात फुलतं. त्यामुळे डबक्यातील लोकांनी दुसऱ्यांवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही डबक्यात आहात. त्यामुळे तुम्ही काय आहात आणि भाजपमध्ये कोण काय आहे, याविषयी आम्हाला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही नेत्याच्या पत्नीवर टीका करण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ भाजपवर आली आहे”, असेही चव्हाण म्हणाल्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.