HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणे यांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र!

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे हे नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधून असतात. महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या अंतर्गत मुलुंड क्रीडा संकुल आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल चालविले जाते. या दोन्ही संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाचे खासगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोध केला आहे. राणे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं असून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.

बाळासाहेबाचा हेतू स्पष्ट व स्वच्छ होता

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. ललित कला प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता राहावी म्हणून यावर महापालीकेचे नियंत्रण असावे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाटले होते. म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीज करून ठेवली. यात सदस्य म्हणून कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर घेतले. यामागे बाळासाहेबाचा हेतू स्पष्ट व स्वच्छ होता. परंतु, आता मात्र तसे राहिले नाही, असं राणे यांनी सांगितलं आहे.

खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही

या प्रतिष्ठानवर विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) देवेंद्रकुमार जैन नियुक्त झाल्या झाल्याच स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्टच्या खासगीकरणाचा घाट घातला जातोय. विशेष महत्वाची बाब म्हणजे देवेंद्र कुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही. जैन हे कुणाच्या निर्देशावरून सामान्य मुंबईकरांच्या हक्काचा जलतरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्ट विकायला निघाले आहेत आणि ते कुणाच्या घशात घालायचे आहेत हेही अगोदरच ठरले असल्याची चर्चा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

1000 हून अधिक कामगारांना उद्ध्वस्त केले

ललित कला प्रतिष्ठाणकडून मागवण्यात आलेले अभिरुची स्वारस्य अर्ज फक्त दिखावा आहे. एकदा खासगीकरण झाले की यात काम करणाऱ्या 1000 हून अधिक कामगारांना उद्ध्वस्त केले जाणार हे स्पष्ट आहे. त्यातील निम्मे लोक हे बाळासाहेबांचे सैनिक आहेत. मुळात या दोन्ही संकुलातून मिळणारा पैसा प्रतिष्ठानच्या तिजोरीत जमा होतो. तरण तलावाच्या नुतनीकरणाचे काम महापालिकेच्या निधीतून होते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रतिष्ठानकडे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

जलतरण तलावाचे पाणी नेमकं कुठं मुरतंय?

यावेळी नितेश राणे यांनी काही सवालही केले आहेत. नफ्यात चालणाऱ्या तरण तलावाचे खासगीकरणच कशासाठी? कुणासाठी? या जलतरण तलावाचे पाणी नेमकं कुठं मुरतंय? हा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व प्रकाराची आपण विशेष समिती नेमून महापौर किशोरी पेडणेकर व त्यांचे ओएसडी जैन यांची चौकशी करावी. हे खासगीकरण थांबवावे. नाहीत आम्ही प्रतिष्ठानचे 100 कर्मचारी घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच सामान्य मराठी माणूस होता. बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती व त्यांनी येणाऱ्या काळाची पावलं ओळखली होती. ही मुंबई फक्त धनदांडग्यांची न राहता येथील सामान्य मुंबईकरांनाही खेळ मैदान, जलतरण तलाव, उद्यान पाहायला मिळावीत, त्याचा लाभ घेता यावा, तिथे आपले कौशल्य विकसित करता यावीत यासाठी त्यांनी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानची स्थापना केली होती. पण आता खुद स्थापन केलेल्या प्रतिष्ठानालाच भ्रष्टाचाराचे केंद्र करण्यात येतंय असा संताप सामान्य नागरिक व्यक्त करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्हाडा इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने होण्यासाठी मुद्रांक शुल्काबाबतचे धोरण निश्चित करा! – उद्धव ठाकरे

Aprna

मोदी सरकार मशिदसाठी ट्रस्ट का उभारु शकत नाही?

swarit

खासदार उदयनराजे यांना अटक

News Desk