वर्धा | देशाला सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसला असून मोदी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका सातत्याने होत आहे. यावरुन भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाविरोधीत लढ्याचं नेतृत्व नितीन गडकरींकडे सोपवलं जावं अशी मागणी केली होती. कोरोना संकटाच्या या काळात पंतप्रधान कार्यालय काहीच कामाचं नसून नरेंद्र मोदींनी परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी त्यांचे सहकारी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली आहे. दरम्यान नितीन गडकरी यांनी स्वामींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते वर्ध्यात बोलत होते.
“मी काही उत्कृष्ट काम वैगेरे करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, डॉक्टर, कंपाउंडर, पॅरामेडिकल आणि सरकारी कर्मचारी जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत. सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला आहे. सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष मधे न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे. सर्व लोक करत असून आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
वर्ध्याच्या औद्योगिक परिसरात जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडिसिविर औषधाच्या उत्पादनास सुरुवात झाली आहे. गडकरी यांच्या माध्यमातून या औषधाच्या उत्पादनास मान्यता मिळाली असून अतिशय कमी वेळात केंद्र सरकारची परवानगी मिळवणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. येथे दररोज तीस हजार कुप्यांची निर्मिती होईल. गुरुवारी गडकरी यांनी कंपनीस भेट देऊन उत्पादनाचा आढावा घेतला. गरजू गरिबांना शासकीय दराने हे औषध उपलब्ध होईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे.
वर्धा में जेनेटीक लाईफ सायन्सेस को भेंट देने के बाद मीडिया से बातचीत. pic.twitter.com/TuO6x32PZi
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 6, 2021
स्वामींनी काय म्हणाले होते?
“ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या करोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं, असंही स्वामींनी म्हटलं आहे. स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्ष वर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिलं. “नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिलं जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,” अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.