मुंबई। युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PMNarendra Modi ) यांनी केले.
अंधेरी – मरोळ येथील ‘अलजामिया-टस-सैफिया’ अरेबिक शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी प्रधानमंत्री मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ‘अलजामिया-टस-सैफिया’चे “कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन, दाऊदी बोहरा” समाजाचे शहजादा अलिअसगर कलीम ऊद्दीन, शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन तसेच दाऊदी बोहरा समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, दाऊदी बोहरा समाजाच्या चार पिढ्यांसोबत माझा संवाद आहे. कोणताही समाज काळानुसार कसा बदलतो करतो यावरच त्या समाजाचा विकास अवलंबून असतो. दाउदी बोहरा समाज ही काळाप्रमाणे बदलत आहे. काळाप्रमाणे नावीन्यपूर्ण शिक्षणाची कास धरत आहे. ही आनंदाची बाब आहे. ‘अलजामिया-टस-सैफिया’ ही देशातील दुसरी अरेबिक शैक्षणिक संस्था स्थापन झाली या समाजाचे हे १५० वर्षांपूर्वीचे स्वप्न आज साकार झाले आहे. गुजरात सुरत येथील संस्थेचे माजी कुलपती डॉ. मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे काम मी पाहिले आहे. नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते आग्रही होते. सूरत येथे त्यांनी कुपोषण आणि जलसाक्षरतेसाठी काम केले. त्यांची सक्रियता ही ऊर्जा देणारी होती. आजही मला या समाजाच्या आजच्या पिढीकडून आपल्याला प्रेम मिळत आहे. हे प्रेम खूप मोलाचे आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, “दाउदी बोहरा” समाज बांधव जगाच्या कुठल्याही देशात असले तरी देशाप्रती त्यांचे प्रेम आणि योगदान खूप आहे आणि भविष्यातही राहील. शिक्षण क्षेत्रातही या समाजाचे खूप मोठे योगदान आहे. शिक्षणाविषयी स्वप्न पाहिल्यानंतर ते प्रयत्न करून पूर्ण करण्याची क्षमता या समाजामध्ये आहे ‘अलजामिया-टस-सैफिया’ या अरेबिक शिक्षण संस्थेत महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे ही चांगली गोष्ट आहे. यापुढेही महिलांचा विकास, महिलांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी ही संस्था आपले योगदान देईल, अशी मला आशा आहे. शासनाकडून युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे राबवली जात आहेत असेही प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री मोदी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र हे दोन्हीही पूरक असले पाहिजेत, अशी धोरणे राबवत आहोत. दाऊदी बोहरा समाज उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. या उद्योजकांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.उद्योगासाठी कर प्रणाली मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शासनाच्या धोरणामुळे नोकरी देणारे तयार होत आहेत. विकास करीत असताना हे शासन वारसा आणि आधुनिकता बरोबर घेवून पुढे जात आहे. देश पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्यात येत आहे. सण – उत्सवांना आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. जुन्या ग्रंथांचे डिजिटलायझेशन केले जात आहे. सरकार पर्यावरणावर भर देत आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरड धान्य वर्ष साजरे करत आहे. जी – २० परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळालेला आहे हा मोठा बहुमान आहे.”दाऊदी बोहरा” समाजातील प्रत्येक नागरिक जो जागतिक पातळीवर आहे तो आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे नाव पुढे नेईल, अशी आशा व्यक्त करतो असेही प्रधानमंत्री मोदी म्हणाले.
यावेळी ‘अलजामिया-टस-सैफिया’ शैक्षणिक संस्थेची माहितीवर आधारित ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली. दाउदी बोहरा समाजाच्या स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
‘अलजामिया-टस-सैफिया’ शैक्षणिक संस्थेविषयी
‘अलजामिया-टस-सैफिया’ ही शैक्षणिक संस्था मुंबई (अंधेरी – मरोळ) येथे दहा वर्षापासून सुरू केली आहे. या संस्थेच्या शैक्षणिक शाखा देश – विदेशात येथे आहेत. या संस्थेच्या वतीने अंधेरी येथे पाच इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून एका इमारतीमध्ये महिला वसतिगृह व दुसऱ्या इमारतीमध्ये मुलांचे वसतिगृह सुरु केले आहे. या संस्थेमध्ये कला, विज्ञान व वाणिज्य या विषयी मुलांना शिक्षण दिले जाते. या विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ आणि अलिगड विद्यापीठ येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी ग्राह्य धरले जाते. वयाच्या १३ व्या वर्षापासून या शैक्षणिक संस्थेमध्ये मुले व मुली शिक्षण घेतात. शिक्षण घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या पदवी शिक्षण समशिक्षण गणले जाते. त्यानंतर अलिगढ़ विद्यापीठामध्ये विद्यार्थी पी. एच. डी. करू शकतात. संस्थेत सुमारे ५०० विद्यार्थी शिकत असून २० शिक्षक कर्मचारी व ३० शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.