मुंबई | खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात उद्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा मूक मोर्चा आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील हा पहिला मराठा मोर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद दिला आहे. उद्याच्या कोल्हापुरातील मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्विट करुन, ही माहिती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.@Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 15, 2021
संभाजीराजे-प्रकाश आंबेडकर यांची भेट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांनी 29 मे रोजी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यावेळी बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.
प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा
आताच्या परिस्थितीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यामध्ये दोन मार्ग आहे. एक म्हणजे रिव्हूय पिटीशन आणि ती फेटाळल्यावर क्युरेटिव्ह हे दोन मार्ग आहेत. तेव्हा राज्य सत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. तो ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
कोल्हापुरातील मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कुणालाही उलटसुलट बोलू नये, संभाजीराजेंचं आवाहन
खासदार संभाजीराजे छत्रपती बोलताना म्हणाले की, “उद्याचं आंदोलन हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटतं हा मोर्चा आहे. पण मूक आंदोलनाचा अर्थच आहे. आपल्याला मूक मोर्चा काढायचा असता तर, आपण काढू शकलो असतो. पण मोर्चा काढण्याची ही परिस्थिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा लोकांना आपण वेठीस धरायचंय का? ज्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी आपल्या 58 मोर्चांच्या माध्यमातून केल्या आहेत. समाज बोलला आहे, आणखी त्यानं रस्त्यावर का उतरायचं? आतापर्यंत समाजानं आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीही बोललं पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. उद्याच्या आंदोलनासाठी सर्वच आमदार, खासदारांना आपण निमंत्रित केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते सर्वजण येतील”.
“आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपणही सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी इथे येणार आहेत. आपल्यापैकी कोणीही त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारायचे नाहीत. उद्या कोणीही बोलायचं नाही. माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचं आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलू द्यायचं, त्यांचं मन मोकळं करु द्या. हवं तेवढा वेळ बोलू द्यात. पण त्यांनी येणं महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे ते सर्वजण येतील.”, असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.